पश्चिम महाराष्ट्र

केंचे यांनी जागवल्या शशी कपूर यांच्या आठवणी

जयसिंग कुंभार

सांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजघराण्यात जन्माला आलेल्या शशी कपूर यांच्यातील माणूसपणाचा हा घट्ट धागा सांगलीतील सुभाष केंचे यांनी उलगडून दाखवला. शशी कपूर यांच्या निधनाची बातमी सोमवारी दुपारी टीव्हीवर पाहिली आणि त्यांच्या अनेक आठवणींचा बांध फुटला.

मुंबईच्या आलिशान ताज हॉटेलमधील बर्लिंग्टन या तारे-तारकांच्या टेलरिंग फर्ममध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे केंचे आयुष्यभर जपून ठेवलेले ते आठवणींचे गाठोडे घेऊनच ‘सकाळ’च्या कार्यालयात आले. शशी साहेबांच्या सहवासातील ते मंतरलेले क्षण सांगताना त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. 

सांगलीतील खणभागातील रहिवासी असलेले केंचे आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. नातवंडासमवेत आयुष्याची संध्याकाळ ते व्यथित करीत असतात. मात्र, मुंबईतील ते दिवस आजही त्यांच्या अगदी जसेच्या तसे डोळ्यांसमोर आहेत. शशी कपूर यांची ती पहिली भेट आजही ते जशीच्या तशी सांगतात.... ‘‘वडील गोरेगावच्या न्यू स्टॅंडर्ड इंजिनिअरिंगमध्ये फोरमन होते. 

१९७१ मध्ये  गोरेगावच्या उन्नतनगर स्कूलमधून सातवी फायनल झालो. मग नोकरीची शोधाशोध सुरू झाली. १९७२ मध्ये थोरल्या भावाच्या ओळखीने ताजमधील बर्लिंग्टन  दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीस लागलो. अनेक तारा तारके त्या दुकानात कपड्यांच्या खरेदीसाठी यायची. त्यात सुनील दत्त होते. मात्र माझ्या मनातील हिरो शशी कपूरच होते. एकदा दुकानाचे मॅनेजर माईक कृपलाणी मला या चॉकलेट हिरोच्या कपड्याची डिलिव्हरी द्यायला पाठवले. कपडे घेऊन वाळकेश्‍वरमधील ॲटलस अपार्टमेंटच्या दारात थांबलो. सुरक्षारक्षकांला ओळखपत्र दाखवून २३ व्या मजल्यावरील त्यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये दाखल झालो. त्यांच्या घरातील मेरी नावाच्या मोलकरणीने दार उघडले. हातातील कपड्यांची थप्पी पाहून त्यांनी आतमध्ये घेतले. बसायला खुर्ची दिली. त्या प्रशस्त हॉलमधील ती शांतता अंगावर येणारी होती.  

साहेब आंघोळीस गेले आहेत. येतीलच असे सांगून मेरी निघून गेली. पाच-दहा मिनिटांत सुहास्य मुद्रेने शशी कपूर समोर आले. त्या इमारतीच्या २४ व्या मजल्यावरच स्विमिंग टॅंक होता. स्विमिंग कोटसहच ते हॉलमध्ये आले. मी उभा राहताच ‘बैठो बैठो’ म्हणत त्यांनी माझ्याकडे सुहास्य कटाक्ष टाकला. त्याचवेळी प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा तिथे आले. (त्यांचे नाव मला मागाहून समजले).  आमच्यासाठी नास्ता बनव असा मेरीला आदेश देत ते आटोपण्यासाठी आतमध्ये गेले. तोपर्यंत चोप्रा तेथील कोचवर आणि मी थोड्या अंतरावर खुर्चीवर बसलो  होतो. काही वेळातच शशीसाहेब आटोपून शुभ्र कपड्यात समोर आले. नास्ताही तोपर्यंत आला. माझा समज झाला की ते चोप्रासाहेबांसोबत नास्ता करतील. मात्र अनपेक्षितपणे ते माझ्याजवळच्या खुर्चीजवळ आले. तिथेच त्यांनी त्यांच्यासाठीही नास्ता मागवला. त्यांच्या  त्या सहवासाने मन भरून आले होते. माझ्या हातातील प्लेट लटा लटा हलत होती. ते पाहून त्यांनी माझ्या  पाठीवर हात फिरवत ‘आरामसे खाओ’ असं म्हणत दिलासा दिला. जाताना माझ्या हातात शंभर रुपयांची टिप ठेवत ते निघून गेले. शशीसाहेबांच्यासोबतची ती पहिली भेट. त्यांच्यातील तो डोंगराऐवढा माणूस पाहून मी  त्यांच्या आयुष्यभरासाठी प्रेमातच पडलो.’’

ते पुढे म्हणाले,‘‘बर्लिंग्टनसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून मी १९७६ पर्यंत काम करीत होतो. त्या काळात त्रिशूल, आप बिती, चोर मचाये शोर, फकिरा, आ गले लग जा अशा कितीतरी त्यांच्या चित्रपटांसाठी त्यांची कपडे कधी त्यांच्या ॲटलस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तर कधी मुंबईतील अनेक स्टुडिओमध्ये घेऊन जायचो. त्यांच्या पत्नी जेनेफर त्यांच्यासाठी आमच्या दुकानात येऊन कपडे डिझाईन करायच्या. आमचे व्यवस्थापक आवर्जून शशीसाहेबांची डिलिव्हरी माझ्याकडेच सोपवायचे. अनेकदा मी धावा धाव करीत स्टुडिओमध्ये  जायचो तेव्हा त्या धावपळीत कपडे मिळाल्यानंतर ते त्या धावपळीतही मला त्यांच्या त्या चिरपरिचित स्मित हास्यासह ‘ कैसे हो..? ’ असा सवाल करायचे. माझा थकवा पार निघून जायचा.’’

‘‘त्या पाच-सहा वर्षांत अनेकदा मी शशीसाहेबांना भेटलो.... पुढे १९७७ ला नोकरी सोडून गावी परतलो. वडिलांच्या सेवेसाठी मी सांगलीत स्थायिक झालो. जगण्याच्या धडपडीत नाना प्रकारची कामे केली. त्यांचे चित्रपट पहातच मी संसार केला. भेट नसली तर मनाने मी त्यांच्यासोबतच राहिलो. मात्र त्यांची शेवटची भेट अगदी योगायोगानेच झाली. नाशिकमध्ये एकदा माझ्या काही कामांसाठी मी तिथं गेलो होतो. तिथल्या एयरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी गर्दी होती. मी त्या गर्दीत उत्सुकतेपोटी शिरलो. तर समोर शशीसाहेब.. मी तत्काळ धावत जाऊन त्यांचे पाय धरले. खांद्याला धरून त्यांनी मला उठवले आणि मला पाहताच चेहरा उजळला. जवळपास दहा-अकरा वर्षांनंतरही मला त्यांनी ओळखले होते. माझ्या पाठीवरून हात फिरवत त्यांनी ‘कैसे हो..’ म्हणत सुहास्य मुद्रेने त्यांनी त्या गर्दीत मला जवळ  घेतले. सारी गर्दी माझ्याकडे पाहात होती. त्या गर्दीलाच कळेना की हा कोण भाग्यवान माणूस आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नी जेनेफरही देवाघरी निघून गेल्या होत्या. मी त्यांची आठवण काढली. तुम्हाला खूप भेटावेसे वाटले असं म्हटलं तर त्यांनीच माझ्या पाठीवर हात फिरवत ‘‘चलता रहेगा... भाई..’ असे म्हणत जीवनाचे अंतिम सत्य स्वीकारल्याचे न बोलताच सांगून टाकले.  आताही ते त्याच सुहास्य मुद्रेने जेनेफर यांच्याकडे निघून गेले असतील. कायमचे.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT