वडाळ्याच्या डॉक्‍टरला फिल्मी स्टाईलने केले किडनॅप! पावणेसहा लाख लुटून सात तासांनी सुटका Canva
सोलापूर

वडाळ्याच्या डॉक्‍टरला फिल्मी स्टाईलने केले किडनॅप!

वडाळ्याच्या डॉक्‍टरला फिल्मी स्टाईलने केले किडनॅप! पावणेसहा लाख लुटून सात तासांनी सुटका

संतोष सिरसट

ओंकार क्‍लिनिक, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील क्‍लिनिक चालक डॉ. अनिल कुलकर्णी यांना पाच अज्ञात इसमांनी फिल्मी स्टाईलने किडनॅप केले.

उत्तर सोलापूर : ओंकार क्‍लिनिक, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील क्‍लिनिक चालक डॉ. अनिल कुलकर्णी (Dr. Anil Kulkarni) यांना पाच अज्ञात इसमांनी फिल्मी स्टाईलने किडनॅप (Kidnap) (Crime) केले. जवळपास सात तासांच्या चित्तथरारक प्रवासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी त्यांच्याकडून जवळपास पाच लाख 88 हजार रुपयांचा ऐवज या अज्ञात इसमांनी हिसकावून घेतला. ही घटना बीबीदारफळ कोंडी रोडवर मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

डॉ. कुलकर्णी यांचे वडाळ्यात रुग्णालय आहे. त्याचबरोबर ते पेट्रोल पंपही चालवतात. ते दररोज सोलापूर ते वडाळा ये-जा करतात. 21 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता ते सोलापुरातून वडाळ्याला गेले. दिवसभर दवाखान्यात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. दवाखान्यातील कामकाज संपल्यानंतर ते पेट्रोल पंपावर येऊन त्या ठिकाणी जमा झालेली पाच लाख 70 हजार 420 रुपये एवढी रक्कम घेऊन ते आपल्या गाडीतून रात्री आठच्या सुमारास वडाळावरून सोलापूरकडे निघाले. सोलापूर- बार्शी या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ते रानमसले - बीबीदारफळ - कोंडी मार्गे सोलापूरला येत होते. बीबीदारफळपासून एमआयडीसीमध्ये आल्यानंतर बीबीदारफळ - कोंडी रोडवर कारंबाकडून एक रस्ता येतो. त्या रस्त्यावर त्यांच्या कारला एक कार आडवी लावली. त्या गाडीमधून तीन-चार अनोळखी इसम बाहेर पडले. त्यापैकी एका इसमाने डॉ. कुलकर्णी यांच्या डोक्‍याला गावठी बंदूक लावून त्यांना गाडीतून खाली काढले व इनोव्हा गाडीमध्ये बसवले. उर्वरित तीन अनोळखी व्यक्तींच्या हातामध्ये कोयते, काठ्या होत्या. गाडीतून काढताना त्यातील एका इसमाने हॉकी स्टिकने त्यांच्या हातावर व पायावर मारहाण केली. त्याचबरोबर उजव्या दंडावर कोयत्याने मारले. त्यामुळे त्या ठिकाणाहून रक्त वाहू लागले. ते रक्त शर्टावर पसरले होते.

त्यावेळी किडनॅपरने "आम्ही तुझी तीन दिवसांपासून वाट पाहतोय. आमच्या भाईच्या खांद्याला गोळी लागली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार घेणे शक्‍य होत नाही. त्यांच्या अंगाला लागलेली गोळी काढण्यासाठी आम्ही तुला घेऊन जात आहोत. भाईच्या अंगामध्ये घुसलेल्या गोळ्या काढ. तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्हाला आमचा भाईचा जीव प्यारा आहे. कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे आहे. तू शांत बस, गोंधळ करू नको. गोंधळ केल्यास तुझे काही खरे नाही' असे डॉ. कुलकर्णी यांना त्यातील इसमाने सांगितले. त्या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी "रुग्णसेवा हा माझा धर्म आहे. तुम्ही मला काहीही करू नका' असे सांगितले. त्यानंतर त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवून बीबीदारफळच्या दिशेने परत नेले. डॉ. कुलकर्णी यांची कार त्यातील एका इसमाने चालू करून ती इनोवाच्या पाठीमागे घेऊन गेले. त्यावेळी इनोवा गाडीत असलेल्या इसमांनी डॉ. कुलकर्णी यांना वेरना गाडीमध्ये काय काय सामान आहे याची विचारणा केली. त्या गाडीमध्ये काय आहे ते आत्ताच सांगा, अशी विचारणा केली. त्या गाडीमध्ये असलेले सामान इनोवा गाडीत ठेवू असे त्यांनी सांगितले. त्यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी त्या गाडीमध्ये कागदपत्रे व पैसे असल्याचे सर्वांना सांगितले. त्यानंतर वेरना गाडीमधील कागदपत्रांची बॅग व पैसे इनोवा गाडीमध्ये ठेवले. त्यानंतर मोहोळच्या दिशेने गाडी घेऊन गेले. मोहोळवरून टेंभुर्णीच्या दिशेने गाडीमध्ये नेले असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सोलापूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

इंदापूरकडे जाताना इनोवामधील एका इसमाने डॉ. कुलकर्णी यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून फेकून दिले. त्यानंतर दोन्ही गाड्या सोलापूर - पुणे महामार्गावरून टेंभुर्णीकडे निघाल्या. मात्र वरवंडच्या टोल नाक्‍यापूर्वीच त्या गाड्यांनी यू टर्न घेऊन त्या परत मोहोळच्या दिशेने निघाल्या. त्यानंतर वेगळ्या मार्गाने ते इंदापूरला घेऊन गेले. त्यावेळी रात्रीचे साडेदहा- अकरा वाजले असतील. इंदापूर येथे पोचल्यानंतर "आमचे भाई खूपच मोठे आहेत' असे सांगून, आमचे काम सुपारी घेणे एवढेच असल्याचे डॉक्‍टरांना सांगितले. इंदापूरहून निमगाव, केतकी, बारामती व फलटण मार्गे जेजुरी येथे डॉक्‍टरांना घेऊन गेले. त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते. त्यानंतर इनोवा गाडी थांबवून त्या गाडीतील इसमाने डॉक्‍टरांना सांगितले की "पेशंट वगैरे काही नाही, आम्ही तुला किडनॅप केले आहे. आम्ही तुला भाईकडे दिले तर भाईला दोन कोटी रुपये तुला द्यावे लागतील. त्यापेक्षा तू आम्हाला एक कोटी रुपये दे आम्ही तुला सोडून देतो.' त्या वेळी डॉक्‍टर कुलकर्णी त्यांना म्हणाले "तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला भयंकर कर्ज असून लोकांकडून उसनवारी करून मी पेट्रोल पंप चालवत आहे.' डॉक्‍टरांनी त्यांना वेरना गाडीमध्ये असलेली रक्कम ठेवून घेऊन सोडून देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी डॉ. कुलकर्णी यांना सासवड, खेड, शिवापूर रस्त्यावर नेऊन हातातील कोयत्याचा धाक दाखवून एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. मात्र डॉ. कुलकर्णी यांनी "एवढी रक्कम माझ्याकडे नाही. तुम्हाला काय करायचे ते करा' असे त्यांना सांगितले. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्या इसमांनी कुलकर्णी यांना वारजे, माळवाडी, पुणेच्या ब्रीजवर सोडून दिले. त्यावेळी डॉक्‍टरांच्या खिशात असलेल्या 19 हजार रुपयांपैकी 18 हजार त्यांनी काढून घेतले व त्यांना गाडीतून खाली ढकलून दिले. "पोलिसात तक्रार दिली तर सात दिवसांच्या आत किंवा दिवाळीत आम्ही तुमच्याकडे परत येऊ' असे त्यांना धमकावले. "तुमच्याबद्दल मी पोलिसात काहीही सांगणार नाही' असे डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले. त्यावेळी त्यापैकी एका इसमाने, तुमची कार मोहोळ एसटी स्टॅंडमध्ये लावली आहे व त्याची चावी चाकाखाली टाकली असल्याचे सांगितले, असेही डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

इनोवामधील चार इसम चालत पुण्याच्या दिशेने निघून गेले. इनोवाचा ड्रायव्हर गाडी घेऊन त्याच्या विरुद्ध दिशेने पुढे गेला. त्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी रस्त्यावरून जाणाऱ्याला हात करून त्या माणसाच्या मोबाईलवरून ओला गाडी बुक केली. त्यानंतर ते स्वारगेट, पुणे येथे गेले. त्यानंतर त्या इसमाच्या मोबाईलवरून घरी पत्नीला फोन करून सुखरूप असल्याचे सांगितले व आपली गाडी मोहोळ एसटी स्टॅंडला आहे, ती भावाला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पुणे येथील डॉ. जितेंद्र मराठे यांना झालेली सगळी हकीकत सांगितली. थोड्याच वेळात डॉ. मराठे स्वारगेट येथे आले व त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जाऊन विश्रांती घेतली. त्यानंतर पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विजय नाईक हे सोलापूरहून त्यांची गाडी घेऊन डॉक्‍टरांना आणण्यासाठी गेले व त्यांच्यासोबत डॉक्‍टर आपल्या घरी परत आले. अशाप्रकारे जवळपास सात तासांच्या चित्तथरारक प्रवासानंतर डॉक्‍टरांची सुटका झाली.

समोर उभे केल्यास सगळ्यांना ओळखीन

ज्या इसमांनी डॉ. कुलकर्णी यांना पळवून नेले ते सर्वजण 25 ते 35 या वयोगटातील होते तर उर्वरित चार जण मराठीत बोलत होते. त्यापैकी एकजण शरीराने जाड तर उर्वरित सर्वजण शरीराने सडपातळ होते. त्यांना जर समोर उभे केले तर त्यांना ओळखीन, असेही डॉ. कुलकर्णी यांनी तालुका पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Bride killed on Wedding Day : लग्नादिवशीच नवरीचा खून करुन नवरदेव फरार, पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

villagers protest: नरभक्षक बिबट्याला ठार करा: ग्रामस्थांची मागणी; कर्जुनेखारे, निंबळक, इसळक, हमीदपूर ग्रामस्थांचा रास्तारोको

Satara Accident:'सातारा-बामणोली एसटीला डंपरची जाेरदार धडक'; वीस प्रवासी जखमी, धोकादायक वळण अन्..

Latest Marathi Breaking News : देश -विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT