सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाकणी आणि सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर "स्वयंचलित गॅस क्लोरिनेशन' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याशिवाय टाकळी योजनेवरही पंपसेट बसविणे, सोरेगाव येथे व्हॉल्व्ह ऍक्चुएटर बसविण्यात येणार आहे. अमृत योजनेतून ही कामे होणार असून, त्यासाठी अंदाजे सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सर्व पाणी प्रक्रिया केंद्रांमधील पाणी प्रक्रियेचा क्रम सारखाच असतो. पाण्यातील रोजजंतूंचा नाश करून त्यातून संसर्ग होऊ नये, हाच पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असतो. पाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये सर्वप्रथम ताज्या पाण्यासोबत प्रक्रिया करावयाच्या पाण्याचा कार्बन डायऑक्साईडशी संयोग करण्यात येतो. जेथे पाण्याचा वातावरणातील हवेशी संपर्क येतो आणि पाण्यातील काही घटकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो. बहुतेक प्रक्रिया केंद्रांमध्ये या पद्धतीची व्यवस्था नसते. त्यानंतर पाण्यामध्ये काही रसायने आणि तुरटी सोडण्यात येते. त्यामुळे पाण्यातील कचरा तळाशी साठतो. आतापर्यंत प्रक्रिया झालेले पाणी मोठ्या टाक्यांमध्ये एकत्र करण्यात येते. तेथे पाण्यातील उर्वरित गाळ काढण्यात येतो. यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी प्रामुख्याने क्लोरिनचा वापर करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ झालेले पाणी वितरणासाठी एकत्र केले जाते.
पाण्यावरील प्रक्रियेतून निर्माण झालेल्या गाळातून आणखी पाणी काढण्यात येते आणि ते गटारांमध्ये सोडण्यात येते.
सोलापूर शहराला तीन स्त्रोतांतून पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये उजनी-पाकणी, टाकळी-सोरेगाव आणि हिप्परगा-भवानी पेठ या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. त्यापैकी हिप्परगा-भवानी पेठ ही योजना सर्वाधिक जुनी असून, त्यानंतर टाकळी-सोरेगाव आणि त्यानंतर उजनी पाकणी ही योजना अस्तित्वात आली. सोलापूर शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या साठी स्मार्ट सिटी योजनेतून उजनी ते सोलापूरपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे.
अशी होतो पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया
गाळ काढणे - यामध्ये पाण्यातील शेवाळे आणि सूक्ष्म जीवाणू काढून टाकण्यात येतात.
वायूवीजन (वायूंशी संयोग) - या प्रक्रियेत पाण्याचा दुर्गंध काढून टाकण्यात येतो. त्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येतो.
मिश्रण - पाण्यामध्ये रसायने आणि वायू सोडण्यात येतात.
प्री-ऑक्सिडेशन - या प्रक्रियेमध्ये पाण्याला आलेली चव, दुर्गंध आणि रंग काढून टाकण्यासाठी ओझोन, पोटॅशिअम परमॅगनेट आणि क्लोरिनसारखे घटक मिसळले जातात. त्यामुळे पाण्याला नैसर्गिक अवस्थेतील गंध, चव आणि रंग प्राप्त होतो.
गोठण प्रक्रिया - पाण्यातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी पाण्यावर गोठण प्रक्रिया केली जाते.
फ्लोक्युलेशन - या प्रक्रियेत पाण्यातील अनावश्यक घटक रासायनिक प्रक्रियेद्वारे पाण्यातून बाहेर काढले जातात.
उन्मळण प्रक्रिया - पाण्यावर प्रक्रिया करताना पाण्यामध्ये मिसळलेला घटक काढून टाकण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे पाण्यातील जड पदार्थ तळाशी साठतात.
गाळण प्रक्रिया - पाण्यामधील वाळू आणि तत्सम घटक बाहेर काढण्यासाठी ही गाळण प्रक्रिया केली जाते.
निर्जंतुकीकरण - पाण्यातून रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्यात येते. त्यासाठी अतिनिल किरणे आणि क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, पोटॅशिअम परमॅगनेट या घटकांचा वापर करण्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.