मंगळवेढा (सोलापूर) : घेतलेल्या कर्जाचे हप्ते कर्ज खात्यावर न भरता स्वत:कडे ठेवून कर्जदारास नाहक त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर व वसुली अधिकारी बसवेश्वर सलगरकर (माळी) (दोघे रा. मंगळवेढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ गंगासागर पाटील (रा. भाळवणी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश बसवेश्वर पाटील (रा. भाळवणी) यांनी रतनचंद शहा सहकारी बॅंकेकडून 6 लाख रुपये कर्ज 2014 मध्ये घेतले होते. सदर कर्जाच्या हप्त्यापोटी 2 लाख व नंतर 1 लाख असे तीन लाख रुपये बॅंकेचे तत्कालिन सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांना दिले असता, त्या रकमेची त्यांनी पावती दिली नाही. त्यासाठी वारंवार टाळाटाळ केली. दरम्यान, हा प्रकार बॅंकेच्या अध्यक्षाला सांगितल्यावर त्यांनी, तुमचा व्यवहार आहे तुम्ही बघून घ्या, असे सांगितले.
दिलेली रक्कम कर्ज खात्याला न भरल्यामुळे थकबाकी वाढत गेली. वसुलीसाठी बसवेश्वर सलगरकर (माळी) यांनी त्रास देत तगादा लावला. या त्रासाला कंटाळून शैलेश पाटील यांनी सोमवार, 15 मार्च रोजी रात्री 12 नंतर राहत्या घरी विषारी औषध घेतले. पहाटेच्या दरम्यान त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी पंढरपुरात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूपूर्वी शैलेश पाटील यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यात सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर व वसुली अधिकारी बसवेश्वर सलगरकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. तसेच "चेअरमन मला न्याय द्या व माझा सातबारा कोरा करा' असेही शैलेश पाटील यांनी व्हिडिओमध्ये मागणी केली.
मार्च अखेरीस बहुतांश बॅंका व पतसंस्था वसुलीसाठी कर्जदाराला कोरोना संकटातही तगादा लावत आहेत. अशा प्रसंगी शहा बॅंकेच्या सरव्यवस्थापक व वसुली अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.