सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून मराठवाडा, कर्नाटक, कोकण, पुणे परिसराला जोडणारे महामार्ग जातात. भारतीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. 1226 किमीच्या रस्त्यासाठी 1786 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 हजार 529 खातेदारांना 1835 कोटी 37 लाख रुपयांच्या रकमेचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून प्रत्येक बाधित खातेदाराला योग्य मोबदला देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून सध्या 22 मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामध्ये पालखी मार्गाच्या कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आठ ठिकाणी चौपदरीचे तर सार्वजनिक बांधकाम पाच ठिकाणी आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नऊ ठिकाणी दुपदरीच्या महामार्गाचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील 275 गावांतून 22 प्रकल्पांचे काम सुरू असून 61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 56 हजार 936, सार्वजनिक बांधकाममध्ये 71 आणि राज्य रस्ते विकास महामंडळात 4452 बाधित जमीन खातेदार आहेत. भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी 3407 कोटी 96 लाख रुपये एवढ्या रकमेची भरपाई देण्यात येणार आहे. आतापर्यंत 26 हजार 529 खातेदारांच्या बॅंक खात्यात 1835 कोटी 37 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. 34 हजार 930 खातेदारांना 637 कोटी 67 लाख रुपये देण्याचे कामही सुरू आहे.
जिल्ह्यातून जाणारे महामार्ग आणि कामाचे अंतर
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोलापूर-सांगली (108.20 किमी), संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (115 किमी), संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (35 किमी), सोलापूर-अक्कलकोट ते गुलबर्गा (40 किमी), सोलापूर-येडशी (16 किमी), सोलापूर-हैदराबाद (20.80 किमी), सोलापूर-पुणे (105 किमी), सोलापूर-विजयपूर (38.70 किमी). यातील सोलापूर-पुणेचे काम पूर्ण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग)- अक्कलकोट-दुधनी ते सिन्नूर (35.85किमी), टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा ते उमदी (144.85 किमी), अक्कलकोट-कोर्सेगाव-तडवळ ते टाकळी (46.45 किमी), अक्कलकोट-नळदुर्ग ते तुळजापूर (39.82 किमी).
राज्य रस्ते विकास महामंडळ- नागणसूर-अक्कलकोट-मुरूम ते डाळिंब (81.56 किमी), कुर्डुवाडी-पंढरपूर, पंढरपूर-सांगोला (79.53 किमी), टेंभुर्णी-म्हसवड (57.67 किमी), पंढरपूर-पिलीव ते म्हसवड (53.08 किमी), कुर्डुवाडी-बार्शी ते येरमाळा (165.25 किमी), सांगोला-महूद ते वेळापूर (57.99 किमी), माढा-आष्टी-येरमाळा ते बार्शी (12.60 किमी) आणि मोहोळ-कुरूल-कामती ते वळसंग (30 किमी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.