सोलापूर : गणेशोत्सव हा सर्वांत मोठा उत्सव असतानाही कोरोनाच्या सावटाखाली ग्राहक मिठाईसह अन्य बाजारपेठांत वावरताना दिसत आहेत. गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्याने मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी वाढू लागली आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे तंतोतंत पालन केले आहे. मात्र मिठाईचे दर वाढल्याने आणि कोरोनाची भीती असल्याने ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
मोदक, जामून, गोड बुंदी, फरसाण, गुळाचे अनारसे, मलई, गुलकंद, पिस्ता, चॉकलेट मोदकही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाई विक्रेत्यांनी नवनवे पदार्थ बनविले आहेत. लॉकडाउनमुळे बंद असलेल्या व्यवसायाला पुन्हा नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न मिठाई विक्रेत्यांनी केला आहे. ग्राहक मास्कचा वापर करीत आणि सोशल डिस्टन्स ठेवत मिठाई खरेदी करीत आहेत. गणेशोत्सवाला सुरवात झाल्याने मिठाईसह लाईटच्या माळा, डेकोरेशनच्या वस्तू खरेदीसाठीही गर्दी होऊ लागली आहे.
मिठाई विक्रेते सुभाष थळंगे म्हणाले, गणेशोत्सव हा वर्षातील मोठा उत्सव आहे. या काळात मिठाई विक्री जोरात असते, ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली असून ठराविक पदार्थांनाच मागणी आहे. ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे आम्ही पालन करतो.
मिठाई विक्रेते चेतनकुमार नरखेडकर म्हणाले, मोदकला ग्राहकांची मागणी असल्याने आम्ही यंदा चॉकलेट, गुलकंद, पिस्ता आणि मलई मोदक विक्रीसाठी ठेवले आहेत. गुळाचे अनारसे आणि भाजणीची चकली हे आमच्याकडील विशेष पदार्थ आहेत. त्यासाठी ग्राहकांची मागणी आहे, परंतु कोरोनाच्या भीतीने ग्राहकांची संख्या 40 टक्क्यांनी घटली आहे.
ग्राहक तानाजी मोरे म्हणाले, गणेशोत्सवाला सुरवात झाली असून तो आनंद कुटुंबीयांसमवेत साजरा करण्याच्या हेतूने मिठाई खरेदी केली. परंतु, यंदा मिठाईचे दर वाढल्याचा अनुभव आला. कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबासोबत खरेदीसाठी बाहेर पडता आले नाही.
नियमांचे पालन करून मिठाई विक्री
शहरातील कोरोनाचा संसर्ग थोडाफार आटोक्यात आणण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होणार असल्याने सर्व दुकानदारांना महापालिकेकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने दुकानदारांनी दुकानासमोर लाकडी बांबू लावले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या सावटातही मिठाई व्रिकी सुरू असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या 40 टक्क्यांनी कमी झाल्याचा अनुभव मिठाई विक्रेत्यांनी कथन केला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.