Degaon Bandhara 
सोलापूर

"सकाळ'ने व्यक्त केलेली भीती ठरली खरी ! देगाव येथील बंधारा महापुरात पुन्हा त्याच ठिकाणी गेला वाहून 

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : देगाव (ता. मोहोळ) येथील बंधाऱ्याबाबत "सकाळ'ने व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरली असून, भोगावती नदीला बुधवारी (ता. 14) आलेल्या महापुरात देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची गेल्यावर्षी दुरुस्त करण्यात आलेली पश्‍चिमेकडील भिंत काल पुन्हा वाहून गेली आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र पाटबंधारे विभाग आणि ठेकेदाराने याकडे गंभीरपणे लक्ष दिले नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणि परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

मोहोळ तालुक्‍यातील देगाव (वा) येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याच्या भरावाची भिंत 2016 च्या पावसाळ्यात वाहून गेली होती. गेल्यावर्षी याच्या दुरुस्तीचे काम मे. युवराज पाटील आणि कंपनी, मंगळवेढा, जि. सोलापूर यांना देण्यात आले होते. दुरुस्ती झाली खरी मात्र निकृष्ट प्रतीच्या कामामुळे आणि मातीच्या भरावाला दगडी पिचिंग केली नसल्याने पावसाळ्यापूर्वीच येथील भराव चार फुटाने खचला होता. त्याबाबत "सकाळ'मध्ये "यावर्षी मोठा पाऊस झाल्यास बंधारा फुटण्याची भीती' या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र संबंधित ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे खचलेल्या भरावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. आणि बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा मातीचा भराव पूर्वीच्याच ठिकाणी खचून व मोठे भगदाड पडून पुन्हा वाहून गेला आहे. 

याबाबत देगाव आणि वाळूज येथील शेतकऱ्यांमध्ये ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. चार फुटाने खचलेल्या भरावाची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी यासाठी वाळूज व देगाव (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतींनी पाटबंधारे विभाग वैराग (ता. बार्शी) यांना तातडीने दुरुस्ती करण्याबाबत निवेदन दिले होते. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा ठेका दिलेल्या मे. युवराज पाटील आणि कंपनीला वारंवार सांगून देखील त्याची दुरुस्ती करत नसल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे, असे पाटबंधारे विभागाने ठेकेदाराला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

2 ऑक्‍टोबर 2016 रोजी भोगावती नदीला आलेल्या पुरात सदर बंधाऱ्याच्या पश्‍चिमेकडील डाव्या बाजूची विंग वॉल व भराव वाहून गेला होता. त्यानंतर या बंधाऱ्याची दुरुस्ती चालू असल्याने गेली चार वर्षे या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेणे पाणीसाठा करता येत नव्हता. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हे 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावर्षी बंधारा पूर्ण क्षमतेने अडवून पाणीसाठा करण्यासाठी आपण त्वरित सदर भरावाची दुरुस्ती करून घ्यावी, असे लेखी पत्र (पत्र जा.क्र.पाशावे/51/2019 ता. 13/03/2019) पाटबंधारे शाखा, वैरागचे सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांनी संबंधित ठेकेदाराला काढले होते. मात्र आदेश काढून दीड- दोन वर्षे झाली तरीही ठेकेदाराने खचलेल्या मातीच्या भरावाच्या दुरुस्तीचे काम केले नाही. परिणामी मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा त्याच ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडून भिंत वाहून गेली आहे. बंधाऱ्याच्या पश्‍चिमेकडील शेतकऱ्यांच्या शेतातीत माती व पिके वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची भरपाई संबंधितांनी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

ठळक 
इर्ले (ता. बार्शी) ते भोयरे (ता. मोहोळ) दरम्यान भोगावती नदीवर पाच बंधारे आहेत. त्यापैकी देगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 62 गाळे असलेला सर्वात मोठा आहे. त्यात 0.152 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होतो. या पाण्यावर देगाव, वाळूज, मनगोळी येथील पिण्याच्या पाण्यासह 2 हजार 260 हेक्‍टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येते. बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यास साडेचार मीटरपर्यंत पाणी अडते. 

याबाबत देगाव (वा)चे उपसरपंच अतुल आतकरे म्हणाले, देगाव येथील भोगावती नदीवरील सर्वात जास्त पाणीसाठा होणारा बंधारा असून या पाण्यावर अनेक गावांचा व शेतीचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. संबंधित ठेकेदार व काम अपूर्ण असताना कामाचे संपूर्ण बिल अदा करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बारामतीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार विशाल हिंगणे 1 मतांनी विजय

Nagradhyaksha List : कुठे कुणाचा नगराध्यक्ष? राज्यातली संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

Anagar Nagar Panchayat Election : अनगर नगरपंचायतीवर राजन पाटलांचा कमळ! निकालाआधीच निवडणूक बिनविरोध; नेमकं काय घडलं?

साताऱ्यात दोन्ही राजेंना अपक्ष उमेदवाराचा दे धक्का, प्रभाग एकमध्ये अपक्षाने उधळला गुलाल

Shirol Nagar Palika Result : आमदार अशोकराव मानेंचा मुलगा, सून दोघांचाही दारूण पराभव, शिरोळकरांनी घराणेशाही मोडीत काढली...

SCROLL FOR NEXT