सोलापूर : प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय ओढणीने बांधून ठार मारण्याची धमकी देऊन दरोडेखोरांनी एक लाख 32 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार जुळे सोलापुरातील गंगाधर नगरात मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला असून, याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुळे सोलापूर परिसरात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समीर लालसाहेब बिराजदार (वय 32, रा. 71, गंगाधर नगर, बॉम्बे पार्कजवळ, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. समीर बिराजदार हे व्ही. व्ही. पी. कॉलेजमध्ये प्राध्यापक असून, गंगाधर नगरात त्यांचे घर आहे. सोमवारी रात्री जेवण करून बिराजदार, त्यांची पत्नी व एक लहान मुलगा असे तिघे मुख्य दरवाजाला आतून कडी लावून बेडरूममध्ये झोपले होते. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास बिराजदार यांना बेडरूमच्या दरवाजाचा आवाज आल्याने ते उठले. त्याच वेळी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा तोडून पाच ते सहा दरोडेखोर बेडरूममध्ये आले. त्यांना पाहून बिराजदार जोरात ओरडल्याने त्यांची पत्नीसुद्धा झोपेतून जागी झाली.
त्या वेळी चोरट्यांनी बिराजदार व त्यांच्या पत्नीचे हात-पाय ओढणीने बांधून आरडाओरड केली तर तुम्हाला जिवे मारतो, अशी धमकी देत बेडरूममधील लाकडी कपाट रॉडच्या मदतीने तोडले. कपाटातील रोख 38 हजार 500, सोन्याचे मिनी गंठण, कानातील रिंग, हातातील कडा, अंगठी, घड्याळ, दोन मोबाईल असा एक लाख 32 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला. चोरट्यांनी बिराजदार यांच्या पत्नीच्या कानातील रिंगा व मणी - मंगळसूत्र काढून देण्यास सांगितल्यावर त्यांनी ते काढून दिले.
याबाबत विजापूर नाका पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या वेळी श्वानाने कुमठे भागाकडे थोड्या अंतरापर्यंत धाव घेतली व नंतर ते घुटमळले. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.