सोलापूर : शहरातील बाजारपेठांमध्ये व अनेक भागांत मोठ्या प्रमाणात जलवाहिनी, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहेत. सणासुदीमुळे बाजापेठेत वाढलेली गर्दी व अर्धवट खोदलेले रस्ते व बंद केलेले रस्ते यामुळे नागरिकांची तारांबळ होत आहे. त्यांना खोदकामाला वळसा घालून लांब अंतराने बाजारपेठेत पोचण्याची कसरत करावी लागत आहे.
मागील काही महिने लॉकडाउनमध्ये बाजारामध्ये अनेक विकासकामे सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, नवीन रस्ते, ड्रेनेजलाइन, जलवाहिनी यासोबत अनेक छोट्या- मोठ्या कामांना सुरवात केली गेली होती. अनलॉकमध्ये बाजारपेठ सुरू झाल्यानंतर देखील ही कामे सुरूच असल्याने वाहतुकीची अडचण झाली आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौक, मधला मारुती परिसर, भांडेगल्ली, पार्क चौक, व्हीआयपी रोड, लक्ष्मी मार्केट यासह शहरातील विविध भागांत रस्त्याची कामे वाहतूक बंद करून केली जात आहेत.
आता मागील पंधरवड्यापासून बाजारपेठेचे व्यवहार सुरू झाले आहेत. बकरी ईद व रक्षाबंधन झाल्यानंतर आता गौरी - गणपतीचा सण सुरू आहे. यामुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कितीतरी प्रमाणात वाढली आहे. दुकानदार व व्यापारी अनेक महिने व्यापार बंद राहिल्याने आता ग्राहकांना माल देण्याच्या घाईत आहेत. त्यातच पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे.
शहरातील अनेक भागात खोदकामे करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पंचकट्टा भागात पूर्वी एक रस्ता बंद होता तर आता दुसरा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. याच रस्त्यावरून मुख्य बाजारपेठेत जाणारे नागरिक व वाहनचालकांची संख्या मोठी असते. आता रस्ता बंद झाल्याने दुसऱ्या भागातून वळसा घालून बाजारात जावे लागत आहे. भांडे गल्ली भागात खराब रस्त्यावर चिखल साचला आहे तर गल्लीबोळात खोदकामे करून ठेवल्याने वाहने नेता येत नाहीत. नागरिकांना कामाच्या ठिकाणावरून गल्ली बदलून दुसऱ्या बाजूने मार्ग काढावा लागत आहे. बाराइमाम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी खोदून मातीचे ढिगारे करून ठेवले आहेत. या प्रकाराने नागरिक व व्यापारी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेक दुकानांसमोरच केलेले खोदकाम पूर्ण केले नसल्याने या दुकानावर ग्राहकांना पोचण्याची अडचण झाली आहे. या कामाची मुदत किती आहे याची माहिती नसल्याने ही कामे कधी पूर्ण होणार, याची कुणालाच माहिती नाही.
नगरसेवक रियाज खरादी म्हणाले, माझ्या हॉटेलसमोर अनेक दिवसांपासून काम सुरू असल्याने रस्ता बंद झाला आहे. ग्राहकांना ये-जा करण्यासाठी अडचण होते आहे.
एकनाथ मंदिर येथील रहिवासी दत्तात्रेय कळंब म्हणाले, येथील ड्रेनेजचे काम अनेक दिवसांपासून लांबले आहे. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रम असताना भाविकांना ये-जा करण्याची अडचण झाली आहे.
पंचकट्टा येथील व्यापारी अजिंक्य उप्पीन म्हणाले, आधी पलीकडचा रस्ता बंद केला. नंतर आता दुसराही रस्ता जेसीबीच्या कामामुळे बंद झाला. या रस्त्यावरून नागरिकांची मोठी वर्दळ होती. त्यांना देखील अडचण झाली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.