सोलापूर : मालमत्ता कर विभागातील शहर व हद्दवाढ परिसरातील मिळकत कराची थकबाकी वसूल होत नसल्याची स्थिती आहे. अभय योजना सुरु करुनही थकबाकी भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता कराची थकबाकी न भरणाऱ्यांच्या सिटी सर्व्हे उताऱ्यावार बोजा चढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. त्यावर आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
अभय योजनेचा घ्यावा लाभ
शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना सुरु केली असून त्याअंतर्गत कर थकबाकीवरील शास्ती व नोटीस फी, वसुलीचा खर्च कपात करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये शास्तीत 80 टक्के सवलत तर डिसेंबरमध्ये 70 टक्के आणि जानेवारी 2021 मध्ये 60 टक्के सवलत देण्यात आली. आता फेब्रुवारी-मार्चमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, मागील 15 दिवसांपासून सायबरटेक कंपनीने मालमत्ता कर विभागाची ऑनलाइन सेवा बंद केल्याने नागरिकांना कर भरता आला नाही. त्यांच्यासाठी आता 15 फेब्रुवारीपर्यंत शास्तीत 60 टक्के सवलत देण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला.
महापालिकेचे दरवर्षीचे वार्षिक अंदाजपत्रक आणि प्रत्यक्षातील उत्पन्नात मोठी तफावत आढळत आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने थकबाकी न भरणाऱ्यांच्या स्थावर मालमत्तांवर मिळकत करांचा बोजा चढविला जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरणाऱ्यांची यादी मुद्रांक शुल्क विभागाला सादर केली जाणार असून त्यानुसार बोजाची नोंद होईल, असेही या बैठकीत ठरले. बोजा चढविल्यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव करून थकबाकी रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यामुळे मिळकतदारांनी वेळेत कराची थकबाकी भरुन घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. या बैठकीस उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, करसंकलन विभागाचे प्रमुख प्रदीप थोडसरे, हद्दवाढ विभागाचे प्रमुख रुउफ बागवान आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.