सोलापूर : पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी साचले. उजनी धरणासह हिप्परगा, औज तलावही हाउसफुल भरले. पावसाळा नुकताच संपला असून, हिवाळ्यातच हद्दवाढ भागासह शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने एक-दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. पूर्वीच्या नियोजनातही बदल झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका हद्दवाढ भागातील नागरिकांना बसला असून, आता त्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे.
टाकळी-सोरेगाव दरम्यानची पाइपलाइन राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उकलण्यात आली होती. आता काम पूर्ण झाले. परंतु टाकळीवरून सोरेगाव पंप हाउसवर पाणी येण्यासाठी तब्बल 60 तासांचा वेळ लागला. त्यामुळे आता शहरवासियांना पुढील आठ दिवस पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळणार आहे. कागदोपत्री जरी तसे नियोजन असले, तरी प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी उपसावे लागत असून, त्यांना नेहमीच कमी दाबाने पाणी मिळत आहे. हद्दवाढ भागातील पाइपलाइन चार ते पाच इंच असल्याने नियमित या भागाला कमी दाबानेच पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात हद्दवाढ भागातील नागरिकांना बाहेरून विकत पाणी घ्यावे लागते, तर दुसरीकडे महापालिकेला पाणीपट्टीही भरावी लागते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहायक अभियंता संजय धनशेट्टी यांच्याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचाही पदभार आहे. त्यातच महावितरणकडून होणारा विद्युत पुरवठाही वारंवार खंडित होत असून, उजनी ते सोलापूरच्या जुन्या पाइपलाइनला सातत्याने गळती लागते. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यातही नागरिकांना एक-दोन दिवसाआड पाणी मिळू शकले नाही.
शहराला दोन दिवसाआड तर हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होईल. त्यादृष्टीने आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाला आता स्वतंत्र अधिकारी मिळेल. सहायक अभियंता ए. एस. उस्तुरगी यांच्याकडे या विभागाचा तात्पुरता पदभार दिला जाईल.
- श्रीकांचना यन्नम, महापौर
हद्दवाढ भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा अद्याप झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे शक्य होऊ शकले नाही. हद्दवाढ भागातील नागरिकांना हिवाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो, हे प्रशासनाचे अपयश आहे. याविरुध्द आंदोलन केले जाईल, तत्पूर्वी अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल, यादृष्टीने ठोस नियोजन करावे.
- राजेश काळे, उपमहापौर
हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने शहरातील काही भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन काही वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, आता उजनी धरण, हिप्परगा व औज तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करायला काहीच अडचणी नाहीत. टाकळी ते सोरेगाव अशी नवी पाइपलाइन झाल्यास निश्चितपणे हद्दवाढ भागाचा कायमचा प्रश्न मिटेल.
- देवेंद्र कोठे, नगरसेवक
प्रभाग 19 हा सभागृह नेते श्रीनिवास करली यांचा मतदारसंघ आहे. तरीही या भागातील नागरिकांना पाच दिवसाआड पाणी भरावे लागते. त्यातही वेळेचे नियोजन नाही. त्याबद्दल अधिकारी तथा कर्मचारीही सांगू शकत नाहीत. सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली असती, तर निश्चितपणे नागरिकांचे समाधान झाले असते. सर्वकाही शक्य असतानाही मागील चार वर्षांत होऊ शकले नाही.
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक
अधिकाऱ्यांची अदलाबदली
स्मार्ट सिटी योजनेतून 110 किलोमीटर सोलापूर ते उजनी ही पाईपलाईन टाकली जात आहे. या पाइपलाइनचे काम आपल्याच काळात पूर्ण होऊन लोकार्पण आपणच करायला हवे, या हेतूने काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नियोजन केले आहे. मात्र, संजय धनशेट्टी यांच्याकडे या पाइपलाइनचे व शहराच्या पाणीपुरवठ्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडे लक्ष देणे अशक्य होऊ लागले असून, त्यांना पाइपलाइनचे पूर्णवेळ काम द्या आणि उस्तुरगी यांच्याकडे पाणीपुरवठ्याचा पदभार सोपवा, अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर आता बदल करणार आहेत.
आपण सत्ताधारी... विनंती नको, आदेश द्या
शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्तांसोबत तातडीची बैठक बोलावली. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपमहापौर राजेश काळे हेदेखील उपस्थित होते. शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड व्हावा, यादृष्टीने नियोजन करा, असे आदेश दिले. त्याचवेळी त्यांनी धनशेट्टी यांच्याकडे कामाचा बोजा अधिक असल्याने त्यांच्याऐवजी ए. एस. उस्तुरगी यांच्याकडे शहराच्या पाणीपुरवठ्याचा पदभार सोपवा, अशी आयुक्तांकडे विनंती केली. परंतु, आपण सत्ताधारी असून, विनंती करण्याऐवजी आदेश द्या, अशी मागणी उपमहापौर राजेश काळे यांनी केली. त्याचवेळी ते बैठक अर्धवट सोडून निघून गेले.
सभागृह नेत्याच्या प्रभागातच टॅंकर
महापालिकेतील एकूण 102 नगरसेवकांमध्ये हद्दवाढ भागातील सर्वाधिक 62 नगरसेवक आहेत. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक फटका हद्दवाढ भागातील नागरिकांना सोसावा लागतो. शहराच्या तुलनेत हद्दवाढ भागातील नगरसेवकांची संख्या अधिक असतानाही मागील चार वर्षांत ना पाइपलाइन बदलली ना पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला. सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या 19 नंबर प्रभागात ठरलेल्या वेळेत पाणी बहुतांश वेळा आलेच नाही. दीड ते दोन तासाच पाणी येते. तेही सात-आठ दिवसाआड येत असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनीच केल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुशच राहिला नसल्याने पाणीपुरवठा चार वर्षांत विस्कळीत झाला, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.