Speaker
Speaker 
सोलापूर

शिक्षणासाठी सर्वकाही ! झूम आणि गूगल मीटच्या जमान्यात गावातील मंदिरांच्या स्पीकर-भोंग्यांनी केली कमाल (Video)

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या महामारीने प्रत्येक क्षेत्र बाधित झाले आहे. याचा सर्वांत जास्त फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. कारण, 12 मार्चपासून जी शिक्षणाची चाके धावायची थांबली ती अद्याप सुरू नाहीत. याला ऑनलाइन शिक्षण हा पर्याय अनेक ठिकाणी सुरू आहे. पण ग्रामीण भागात जेथे मुलांकडे, पालकांकडे अँड्राईड मोबाईल नसतो; असला तरी त्याला इंटरनेटचा रेंज नसतो अशा अनेक समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. मात्र यावर उपाय म्हणून अक्कलकोट तालुक्‍यातील बादोले गावातील एका शाळेने नामी शक्कल लढवून गावातील मंदिरे तसेच समाजमंदिरवरील स्पीकर-भोंग्यांवरून शैक्षणिक धडे द्यायला सुरवात केली आहे. 

सध्या शहर व ग्रामीण भागात सर्वत्र व्हॉट्‌सऍप, फेसबुक, यू-ट्यूब, झूम ऍप तसेच गूगल मीट यावर शिक्षण सुरू आहे. बादोले (ता. अक्कलकोट) येथील के. पी. शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते यांनी महादेव सोनकर व डिजिटल युगात पत्रलेखनाचे छंद स्वतः बाळगून विद्यार्थी वर्गास आवड लावणारे कलाशिक्षक मयूर दंतकाळे यांना गावात मोबाईल सर्व्हे करण्यास सांगितले असता, त्यांना पाचवी ते दहावीच्या वर्गातील 375 मुलांपैकी अँड्रॉइड व साधे असे मिळून फक्त 90 विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आले. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला येत असलेली बाधा ओळखून श्री. दंतकाळे यांनी यावर एक नामी शक्कल लढवली. 

गावातील मंदिरे व मशीद तसेच समाजमंदिर यांवरील स्पीकर हे शिक्षणाचे माध्यम होऊ शकतील का, याची चाचपणी केली गेली. त्यानुसार गावातील महादेव मंदिर, खंडोबा मंदिर, विठ्ठल मंदिर तसेच मशीद येथे शाळेकडून पत्रे दिली गेली. त्यापैकी तिन्ही मंदिरांची परवानगी मिळाली असल्याने तिथे सोमवारपासून स्पीकरद्वारे शिक्षण देणे सुरू झाले आहे. यात इयता पाचवी ते आठवी मराठी विषयांची सर्व गाणी यू-ट्यूबवरून डाउनलोड केली गेली आणि त्याला स्वतः शिक्षकांनी कवितेची प्रस्तावना केली. त्याचप्रमाणे गणिताचे पाढेदेखील तयार केले असून त्याचे एमपी-थ्रीमध्ये रूपांतर करून चार पेन ड्रॉइव्ह तयार करण्यात आले. आता गावातील तिन्ही मंदिरांवर सकाळी सात ते नऊ या शैक्षणिक धडे देण्यात येत आहेत. याची जबाबदारी सिद्धाराम वाकडे, भीम कोरे व कटेप्पा गायकवाड या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. अशा रीतीने मोबाईल नाही म्हणून शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा जरी बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू राहिले आहे. यामुळे कोरोना काळातसुद्धा आता बादोले गावात हळूहळू शैक्षणिक वातावरण वाढीस लागल्याचे दिसत आहे. याला या शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते यांच्याबरोबर कैलास गायकवाड व नागनाथ धर्मसाले या शिक्षकांचे देखील सहकार्य लाभत आहे. यातून एक वेगळी प्रेरणा घेऊन इतर गावांनी व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारे शिक्षण चालू ठेवता येते का, याची चाचपणी करणे आवश्‍यक झाले आहे.

शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेने सकारात्मक वाटचाल
एकीकडे देशात डिजिटल इंडियाची क्रांती होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असताना, ग्रामीण भागातील विद्यार्थी पुरेशा सोयी-सुविधांअभावी शिक्षणाला मुकत आहेत. परंतु, शिक्षकाची कल्पकता या सर्व गोष्टींवर मात करून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम काम सुरूच ठेवले आहे. बादोले गावातील के. पी. गायकवाड माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक मयूर दंतकाळे यांचा व शाळेचा उपक्रम मात्र शिक्षणाच्या प्रगतीच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करणारे व पथदर्शी प्रकल्प म्हणून येत्या काळात सर्वमान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. 

याच्याएवढा दुसरा आनंद कोणताही नाही
या अनोख्या प्रयोगाबद्दल कलाशिक्षक मयूर दंतकाळे म्हणाले, गावकरी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून गावातील तिन्ही मंदिरे व बौद्ध समाजमंदिर येथील स्पीकरवरून शिक्षण सुरू केले आहे. विद्यार्थी घरी बसून गाणे व पाढे शिकत आहेत व दिवसभर गुणगुणत आहेत, याच्याएवढा दुसरा आनंद कोणताही नाही. इतर शाळांनीही पुढाकार घेऊन वरील उपक्रम सुरू करावेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT