मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील हिंगणी धरणक्षेत्र व ढाळे पिंपळगाव धरणक्षेत्र परिसर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी परिचित आहे. हिंगणी, पिंपरी, साकत, मळेगाव, उपळे, महागाव, बावी, जामगाव, नांदनीच्या द्राक्षची गोडी सातासमुद्रापार पोचली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकवलेली सोन्यासारखी द्राक्ष कवडीमोल दराने विकली जात असल्याने बळीराजा मात्र हतबल झाला आहे.
अजितदादा जरा बळीराजाकडे लक्ष द्या ! शेतात उभी पिके जळत आहेत, तरीही बिलासाठी वीज कनेक्शन तोडणी सुरुच
राज्यभरात सुरू असलेली सततची लॉकडाऊनची चर्चा, अवकाळीची टांगती तलवार यामुळे द्राक्ष व्यापाऱ्यांना आयतेचे कोलीत मिळाले आहे. 50 ते 60 रुपये दराने विकली जाणारी निर्यातक्षम द्राक्ष अवघ्या 20 ते 30 रुपये दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे सलग दुसरा हंगामही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खतांचे वाढलेले दर, बियाणांचे वाढलेले दर, मजूरीचे वाढलेले दर, व्यापाऱ्यांची सुरू असलेली मनमानी, एक्स्पोर्टचे कमी झालेले दर, बेदाणा निर्मितीचा वाढलेला खर्च परवडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
वेळप्रसंगी कुटूंबाकडे दुर्लक्ष करून, स्वतःचे पोट मारून, उपाशी राहून शेतकऱ्यांनी एक किलो, दीड किलो, दोन किलो वजनापर्यंतचे द्राक्षचे घड तयार केले आहेत. मात्र गडगडलेल्या दराने शेतकऱ्यांचे 'मनसुख' झाले नसून मन "सुन्न" झाले आहे. द्राक्ष बरोबरच कलिंगड, खरबूज बटाटे, टोमॅटो व पालेभाज्याचे दरदेखील कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट व लहरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेला बळीराजा कधी बाहेर पडणार व कधी सोन्यासारखे दिवस येणार हाच विचार बळीराजा दिवस-रात्र करीत आहे.
गतवर्षीचा द्राक्ष हंगाम कोरोनाच्या सावटाखाली गेला. तरी नाऊमेद न होता चालू हंगामात जोमाने द्राक्ष पीक आणले. मात्र याहीवर्षी कोरोनाची कुऱ्हाड द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली. आणि भाव कवडीमोल झाले. आम्ही फक्त पिकवायचं आणि भाव मिळाला नाही म्हणून हतबल व्हायचं का? मायबाप सरकारने मदत करता आली नाही तर निदान लॉकडाऊनसारखे निर्णय घेताना जगाच्या पोशिंद्याचा विचार करावा. अन्यथा झालेली आर्थिक नुकसानभरपाई मिळवुन द्यावी.
- रामदास काटमोरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी-पिंपरी (सा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.