सोलापूर : गणेशोत्सव काळात मंडळांना ३१ ऑगस्ट आणि ३, ५ आणि ९ सप्टेंबर या चार दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाच्या मर्यादेत स्पीकरला परवानगी असणार आहे. पण, शहरातील मंडळांनी गणपती आगमन (३१ ऑगस्ट) व उत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांत स्पीकरला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची मागणी कळविली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवाना घेण्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. http:\\citizen.mahapolice.gov.in\citizen\MH.index.aspx यावर माहिती भरताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित जिल्हा तथा शहर-ग्रामीण निवडावे लागणार आहे. पोलिस ठाण्याला जावे लागू नये म्हणून त्या वेबसाईटवरून मंडळांना ऑनलाइन परवाना मिळणार आहे. तत्पूर्वी, अर्जात भरलेल्या माहितीची पडताळणी संबंधित यंत्रणेकडून होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ग्रामीण पोलिसांनी ‘एक गाव- एक गणपती’साठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनासह इतर आजारांबद्दल मंडळांनी जनजागृती व प्रबोधन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मंडळांना परवाना मिळण्याची पद्धत
ऑनलाइन लिंकवर वैयक्तिक माहिती भरताना ई-मेल व मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर अर्जदाराने वैयक्तिक माहिती भरून लॉगइन आयडी, पासवर्ड तयार करून घ्यावा. तोच यूजर आयडी व पासवर्ड तयार झाल्यावर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर टाकून ‘व्हॅलिडेट’वर क्लिक करावे. पुन्हा होम स्क्रीनवर येऊन तो यूजर आयडी व पासवर्ड टाकून मराठी भाषा निवडावी. ‘नागरिकांसाठी सेवा’ यावर जाऊन गणपती चित्रावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज ओपन होईल आणि त्या ठिकाणी सगळी माहिती भरा. त्यानंतर पाच ते दहा सदस्यांची नावे व मोबाईल नंबर टाकावेत. मूर्ती प्रतिष्ठापना कधी करणार आहात, मिरवणूक काढणार आहात की नाही, मिरवणूक काढणार असाल तर त्याची वेळ, मार्ग कसा असेल याची माहिती भरावी लागेल. तसेच मंडपाचे स्वरूप, मंडपवाल्याचे नाव, मूर्तीची उंची, मूर्तिकाराचे नावदेखील भरावे लागणार आहे. अर्ज भरताना अर्जदाराचा लहान आकाराचा फोटो व कागदपत्रे अपलोड करावीत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव - एक गणपती’ची संकल्पना रुजवावी. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. पर्यावरणपूरक उत्सव व्हावा. मंडळांनी शांतता व सुव्यवस्था राखावी. कोरोनासह डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू अशा आजारांबद्दल व ‘बेटी पढाओ - बेटी बचाओ’ची जनजागृती करावी.
- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.