केतूर (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात रब्बी हंगामातील ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर गहू काढण्याची लगबग सुरु झाली आहे. या भागात हार्वेस्टर यंत्राच्या साह्याने गहू पिकाची काढणी जोमात सुरू आहे.
हार्वेस्टर मशीनद्वारे 1 एकर गहू काढण्यासाठी 2800 रुपये तर अर्धा एकर गहू काढण्यासाठी 1400 रुपये घेतले जात असून अर्ध्यातासातच गव्हाची काढणी होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट वाचत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या यंत्राच्या साह्याने गहू काढणीला प्राधान्य देत आहेत. मशीनमुळे कमी वेळात गहू काढणी होत असल्याने मनुष्यबळही कमी लागत आहे तर मशीनने गहू काढल्याने धान्यात कचऱ्याचे प्रमाणही कमी झाले आहे. निर्मळ धान्य तयार होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील बागायती भागात वरचेवर गव्हाचे पीक कमी होत आहे. शासनाच्या वतीने रेशनवर गहू उपलब्ध होत असल्याने घरगुती वापरासाठी शेतामध्ये गव्हाचे पीक घेणे कमी झाले आहे.
गतवर्षी पाऊसकाळ जास्त काळ रेंगाळल्याने शेतात पेरणी योग्य वाफसा न झाल्याने गव्हाच्या पेरण्या उशीर झाल्या होत्या. त्यातच थंडीही कमी प्रमाणात पडल्याने उत्पादनात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. वारंवार बदल नांदेड बदलणारे वातावरणामुळे शेतकरी रब्बी हंगाम लवकर संपवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याची लगबग सुरू आहे. त्यातच परिसरात हरियाणा, पंजाब या ठिकाणच्या हार्वेस्टर मशीन मोठ्याप्रमाणावर आल्याने स्थानिक मशीन वाल्याच्या पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
'हार्वेस्टर यंत्रामुळे गव्हाची काढणी लवकरात लवकर उरकली जात आहे. त्यामुळे वेळ आणि कष्ट वाचत आहेत.'
- प्रभाकर पिंपळे, शेतकरी, हिंगणी'इंधन दरवाढीमुळे यंत्राच्या दरातही वाढ झाली आहे. अगोदरच शेतीव्यवसाय संकटात असताना इंधन दरवाढीने त्यात तेल ओतण्याचे काम केले आहे.'
- गणेश खुळे, शेतकरी, गुलमोहरवाडी.'तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्र परिसरात उसाचे क्षेत्र वाढत असल्याने वरचेवर गव्हाचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्याच प्रमाणे शेतकरी इतर तरकारी (भाजीपाला) पिकाकडेही वळत आहे.'
- राजेंद्र ढवळे, शेतकरी, देलवडी.'सध्या शेतकऱ्याकडून योग्य दरात भाव मिळत असल्यामुळे शेतकरी व ग्राहक यांचा फायदा होत असल्याने ग्राहक शेतकऱ्याकडून गहू खरेदीला प्राधान्य देत आहेत.'
- शिवाजी चाकणे, शेतकरी, देलवडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.