एकेकाळी हवेसे वाटणारे विजयकुमार देशमुख आता डोईजड !
एकेकाळी हवेसे वाटणारे विजयकुमार देशमुख आता डोईजड ! Canva
सोलापूर

बाजार समितीसाठी एकेकाळी हवेसे वाटणारे विजयकुमार देशमुख आता डोईजड !

संतोष सिरसट

सहकाराच्या राजकारणात कोणताही पक्ष नसतो. सहकाराचे राजकारण व पक्षीय राजकारण हे वेगवेगळे असते.

सोलापूर : मितभाषी, संयमी असलेल्या माजी पालकमंत्री, आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांना सोबत घेऊन दक्षिणेवर स्वारी करण्याचा बेत अनेकांनी आखला, पण दक्षिणेवर स्वारी करण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या व एकमेकांचे विरोधक असलेले माजी पालकमंत्री आमदार देशमुख, माजी आमदार दिलीप माने (Former MLA Dilip Mane), माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) हे विधानसभेला एकत्र लढले. तिघांनीही एकमेकांचा प्रचार केला. सहकाराच्या राजकारणात तत्कालीन सहकार मंत्र्यांना अस्मान दाखवण्यासाठी माजी पालकमंत्री देशमुख यांना सोबत घेण्याचे माजी आमदार माने यांची चाल आता त्यांच्याच अंगलट आली असल्याचे सध्या बाजार समितीत सुरू असलेल्या गोंधळावरून स्पष्ट होते. त्यामुळे एकेकाळी हवे असलेले देशमुख आता डोईजड झाल्याचे स्पष्ट होत आहे.

सहकाराच्या राजकारणात कोणताही पक्ष नसतो. सहकाराचे राजकारण व पक्षीय राजकारण हे वेगवेगळे असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाजार समितीच्या राजकारणात आपल्या फायद्याचा विचार करून तत्कालीन पालकमंत्री देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यावेळी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान देण्याचा कायदा केला. ज्या शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये जातो त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांनाच असायला हवा, याचा विचार करून तत्कालीन सहकारमंत्री देशमुख यांनी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा अधिकार दिला. त्या कायद्याचा आपल्याला फायदा होईल व शेतकऱ्यांनाही त्यांचा अधिकार मिळेल असा त्यांचा विचार होता. मात्र, राजकीय खेळांमध्ये तरबेज असलेल्या माने यांनी तत्कालीन सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देशमुख यांना सहकाराच्या राजकारणात त्यांच्याच पक्षाच्या तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरविले. तत्कालीन सहकारमंत्री देशमुख व तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामध्ये दोन पॅनेल तयार झाले व तत्कालीन पालकमंत्री देशमुख यांच्या पनेलची धुरा माजी आमदार माने यांनी सांभाळली. तत्कालीन सहकारमंत्री एकीकडे पडले, एकटे पडले. त्यांच्याविरोधात उत्तर व दक्षिण तालुक्‍यातील सर्वजण एकत्र आले व त्यांच्या पॅनेलचा पराभव केला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने सर्वजण आनंदित झाले. पण आता सभापती करायचे कुणाला, असा प्रश्न तयार झाला. त्यावेळी अनेक बेरीज-वजाबाकी यांचा विचार करण्यात आला. त्याचबरोबर जातीय समीकरणे ही जुळविण्यात आली व तत्कालीन पालकमंत्री असलेल्या विजयकुमार देशमुख यांना बाजार समितीचे सभापती करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय उपसभापतिपदी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील श्रीशैल नरोळे यांना संधी देण्यात आली. ज्यांनी बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी यासाठी जो प्रयत्न केला, त्या माजी आमदार माने यांच्या हाती यातून काहीच लागले नाही. एकेकाळी बाजार समितीवर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नेत्यांचे वर्चस्व होते. याशिवाय विशिष्ट जातीचे राजकारण बाजार समितीमध्ये सुरू असायचे. त्या परंपरेला छेद देण्याचं काम माने यांनी केले होते. मात्र, ते टिकविण्यात त्यांना अपयश आल्याचे सध्या सुरू असलेल्या घडामोडीवरून दिसून येते.

राज्यात आता महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष त्या आघाडीमध्ये आहेत. त्याचाही थोडाफार परिणाम बाजार समितीच्या निवड प्रक्रियेवर होत नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. सध्या आमदार विजयकुमार देशमुख हे सभापती आहेत. ते पक्षीय पातळीवर विचार केला असता भाजपचे आहेत. मात्र, भाजपचा सभापती कशाला ठेवायचा, असा विचार सत्ताधाऱ्यांना झाला असेल का, असाही प्रश्न या निमित्ताने चर्चेला येत आहे. एकेकाळी सगळ्यांना हवे असलेले विजयकुमार देशमुख आत्ताच नकोसे का झाले, नेमके कोणाला ते नको आहेत, ज्यांनी त्यांना सभापती करण्यासाठी अट्टाहास केला तेच लोक आता विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात एकत्र का येऊ लागले आहेत, या प्रश्नांची उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.

मितभाषी स्वभावाचे विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व संचालकांचे एकमत ठेवून कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे अनेक संचालकांसह कर्मचाऱ्यांनाही सभापतिपदी देशमुखच असावेत असे वाटू लागले आहे. त्यामुळे आता सभापती असलेल्या देशमुख यांना विरोध करणाऱ्यांना त्यांना पदावरून खाली कसं करावं याचा प्रश्न पडला आहे. आमदार देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. पण त्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याने आता पुढे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

सत्तेच्या वाट्यासाठी सर्व काही

एकूणच या बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तेचा वाटा आपल्यालाच मिळावा, या उद्देशाने पक्षीय राजकारण बाजूला सारून सोबत घेतलेले विजयकुमार देशमुख हेच आता सत्ताधारी मंडळींना डोईजड ठरत असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सभापतिपदी देशमुख राहतात की आणखी काही नाट्यमय घडामोडी घडून दुसऱ्याला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्‍याचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT