माढा (सोलापूर) : माढा तालुक्यातील उंदरगाव व माढा या गावांमध्ये "गोवर्धन वीरगळ' ही ऐतिहासिक दगडी शिल्पे आढळली असून, ही शिल्पे पशू रक्षणार्थ बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेली आहेत. यामुळे सीना काठावरील गावांसह जिल्ह्याचा सुमारे अकराव्या ते बाराव्या शतकापर्यंतचा जाज्वल्य इतिहास समोर आल्याचे इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांच्या संशोधनातून समोर येत आहे.
अकराव्या-बाराव्या शतकातील शिल्पे
याबाबत श्री. चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी, की वीरगळींच्या अनेक प्रकारांपैकी ही शिल्पे गोवर्धन वीरगळ प्रकारात मोडतात. प्राचीन काळातील समाजात पशुधनाचे महत्त्व होते. तेव्हाचा समाज हा कृषीसंपन्न असून, उदरनिर्वाह शेतीतील उत्पन्नावर अवलंबून असल्याने पशूंना व गो-धनाला घरातील सदस्याप्रमाणेच वागवत. गावांवर आक्रमणे व्हायची तेव्हा घरातील धनधान्य व चक्क गोठ्यातील गाई-बैलांना चोरून नेले जायचे. या झटापटीत पशूरक्षणार्थ बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ गोवर्धन वीरगळ उभारून त्या लढाईचा प्रसंग शिल्परूपातून जपला जात असे. उंदरगाव व माढा येथे अशी शिल्पे आढळली असून त्यांवर शिलालेख नसले तरी कोरीव कामावरून ऐतिहासिक कालक्रम पाहता ती अकराव्या ते बाराव्या शतकांतील असल्याचा निष्कर्ष श्री. चव्हाण यांनी संशोधनातून काढला आहे.
प्राचीन व मध्ययुगीन सीनाकाठच्या परिसरातील तत्कालीन लोकजीवनाचा उलगडा
या शिल्पांचे वाचन खालून वर केले जाते, त्यानुसार उंदरगाव व माढा येथील दोन्ही गोवर्धन वीरगळींवर अनुक्रमे सर्वांत खाली घोडदळ-पायदळातील युद्ध दर्शवले असून, उंदरगावातील शिल्पावर मृत वीरांच्या डोईवरील पट्टीवर गाई-बैलांच्या चार आकृत्या, मृत्यूनंतर त्याच्या आत्म्यासह स्वर्गगमन करणाऱ्या दोन दासी व शेवटी शिवाची पूजा करताना मृत वीर असे प्रसंग आहेत. माढेश्वरी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या परिसरातील सर्वांत मोठ्या गोवर्धन वीरगळीवर अनुक्रमे मृत वीरांसह गाई-बैलांच्या तीन शिल्पाकृती, दोन घोडेस्वार व पायदळ वीरामधील युद्ध, घोड्यांच्या टापाखाली एक व्यक्ती, चार दासींसह स्वर्गगमन, कैलासात शिवपूजा करताना वीर, सोबत सूरांगना, नंदीचे शिल्प, कीर्तिमुख व कैलासाचे शिखर असे पाच शिल्पपट असून, यांतून प्राचीन व मध्ययुगीन सीनाकाठच्या परिसराची तत्कालीन सामाजिक स्थिती, वेशभूषा, धार्मिक संकल्पना, चालिरीती, कृषी व्यवस्था व लोकजीवनातील पशूंचे स्थान यांचा उलगडा होत असल्याचे मयूर चव्हाण यांनी सांगितले.
उंदरगाव, वाकाव, केवड, उपळाई, माढा येथे ऐतिहासिक शिल्पे सापडत आहेत
परिसराचा ऐतिहासिक कालक्रम सांगताना चव्हाण म्हणाले, की सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी संपूर्ण सोलापूर जिल्हा सातवाहनांच्या कुंतलदेशात मोडत होता. वाकाव येथे सातवाहनकालीन पुरावेही संशोधकांना पूर्वी मिळाले आहेत. सातवाहन काळात ही प्रसिद्ध व्यापारी क्षेत्रे असून उंदरगाव-वाकाव येथे जकात नाके होते. जिल्ह्यावर अनुक्रमे सहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकूट पुढे चालुक्य, कलचुरी, शिलाहार, देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सीना-भीमा खोरे हा कृषिसंपन्न भाग यादवांकडे असल्यानेच येथे यादव राजांच्या खास सेनानींचे वास्तव्य राहिल्याचे उल्लेख हाती लागले असून, आसपासच्या तालुक्यांसह परिसरातील उंदरगाव, वाकाव, केवड, उपळाई, माढा येथे ऐतिहासिक शिल्पे सापडत आहेत. भारतात हजारो वर्षांपासून कृषकांनी वृषभाला अर्थात बैलाला व शेतीशी निगडित पशुधनाला पूजनीय मानल्यानेच त्या काळचे लोक त्यांसाठी प्राण देण्यासही तयार असत व हीच भावना तेव्हाच्या सीनाकाठच्या परिसरातही रुजल्याचे गोवर्धन वीरगळींतून समोर येत असल्याचे मयूर चव्हाण यांनी या निमित्ताने सांगितले.प्रतीक्रिया
इतिहास संशोधक मयूर चव्हाण म्हणतात, सुमारे दोन हजार वर्षांचा व त्यापेक्षाही प्राचीन पार्श्वभूमी असलेल्या सीना नदीकाठावरील गावांत सापडलेल्या या शिल्पांतून तत्कालीन लोकसंस्कृती उजेडात येत असून, जिल्ह्यासह राज्याच्या इतिहासात भर पडत आहे. महाराष्ट्रात गावोगावी विखुरलेल्या अशा शिल्पांचे संशोधन झाल्यास इतिहासाचा उलगडा होईल. हा वारसा जपण्यासाठी स्थानिक प्रशासन व स्थानिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.