सोलापूर : सोलापूर शहर विशेषतः शहराच्या विस्तारित भागात पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. हद्दवाढ भागातील अनेक ठिकाणी तब्बल आठ ते नऊ दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईने हैराण झालेल्या येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्याच्या तसूभर घोटासाठी तरसावे लागत आहे.
१५ जूननंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा बुडबुडा विरून गेला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पार कोलमडून गेले असून भविष्यात पाणी टंचाईच्या झळा आणखीन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषत्वे, हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी तब्बल आठ ते नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे.बेफिकीर अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा पावसावर हवाला ठेवला आहे. यंदाचा तीव्र उन्हाळा अन् वीजेचा लपंडाव यामुळे महापालिकेने तीन दिवसाआड शहराला पाणी देण्याचा तयार केलेला नियोजनबद्ध आराखडा गेल्या तीन महिन्यांपासून कागदावरच राहिला हे वास्तव आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी खालावली जाते. त्यामुळे दुबार पंपिंग करून उपसा करावा लागतो. सध्याच्या विस्कळित पाणीपुरवठ्यामध्ये यातून अधिकच भर पडणार आहे. दरम्यान, पाऊस पडला तरच पाणी समस्येवर नियंत्रण आणणे महापालिका प्रशासनाला शक्य आहे. अन्यथा उन्हाळ्यापेक्षा वाईट परिस्थिती पावसाळ्यातील या जून महिन्यात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील पाणी पुरवठा आता चार दिवसांवरून काही भागांमध्ये तब्बल आठ, नऊ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. खास करून हद्दवाढीत पाण्याचे भीषण टंचाई आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची स्थिती असून उजनी धरणात दुबार पंपिंग सुरू करावे लागणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील विस्कळित पाणीपुरवठा, होणारा पाणीपुरवठा देखील दूषित, सोडण्यात येणारे पाणी अपुरा आणि अवेळी अशा अनेक पाण्याच्या समस्यांना शहरातील नागरिक तोंड देत आहेत. यावर उपाययोजना करीत महापालिकेने शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणि तीन दिवसाआड नागरिकांना पाणी देण्यासाठी आराखडा तयार केला. तसे वेळापत्रक बनविले.
मात्र, अवकाळीमुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ लागल्याने त्याचा फटका देखील शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. उजनी पंप हाऊस टाकळी व इतर जलशुद्धीकरण केंद्र परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंपिंग केंद्र येथील यंत्रणा थांबते. यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन पुढे जाते. परिणामी पाणीपुरवठा विस्कळित होतो, अशी ही विस्कळित चक्र पद्धती. यावर पर्याय म्हणून आढेगाव येथील विद्युत सर्व स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले.
तरीही शहराला मागील तीन महिन्यात तीन दिवसाआड पाणी देणे प्रशासनाला शक्य झाले नाही. उलट शहरातील काही भागांमध्ये आजमितीला कुठे पाच दिवसांआड, कुठे सहा तर कुठे आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जून महिन्यातील पाऊस या समस्यांतून मार्ग काढेल असे वाटत असतानाच, पावसानेही हुलकावणी दिल्याने शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती आणखीनच बिकट बनणार असल्याचे दिसत आहे. त्यातच वारीमुळे उजनीतून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनीतील पाण्याची पातळी आणखीनच खाली जाणार त्याचाही थेट परिणाम सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
विस्कळित अन् दूषित पाणीपुरवठ्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी
सोलापूर : शहरातील बुधवार पेठ परिसरातील मोटे वस्ती, साठे चाळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व इतर नगरातील काही भागांमध्ये कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा सातत्याने होत असल्याने माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आज मंगळवारी (ता.२०) संबंधित परिसराची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
बुधवार पेठ परिसरासह प्रभाग क्रमांक पाचमधील अनेक नगरामध्ये दूषित पाणीपुरवठा व विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही याची गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे श्री. चंदनशिवे यांनी या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने हे काम हाती घेणे बाबतच्या विनंती सूचना केली होती. त्यानुसार, मंगळवारी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व्यंकटेश चोबे, विभागीय अधिकारी, अवेक्षक अजिंक्य विपत या महपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जय मल्हार चौक, नरवीर तानाजी चौक, साठे चाळ, मोठे वस्ती, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अद्याप पाऊस पडलेला नाही. पाऊस झाला असता तर शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होते. वारीला उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यावर थोडा परिणाम होणार आहे. पंपाची लेव्हल आणि पाण्याची पातळी या दोन्हीची योग्य सांगड घालण्यासाठी दुबार पंपिंगद्वारे पाण्याची उपसा करावा लागणार आहे.
- व्यंकटेश चोबे, सहा. अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.