सोलापूर : आसामच्या नागाव जिल्ह्यातील फारुख खान यांना सोलापूरने आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख दिले आहे. ज्या सोलापूर शहर व परिसराने त्यांच्या हाताला काम दिले त्याच सोलापुरात फारुख खान यांच्या पत्नी वाहिदा यांचा कोरोनाने बळी घेतला. अवघ्या वीस वर्षांची पत्नी (सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात कमी वयाची व्यक्ती) कोरोनामुळे गेली त्याच दिवशी फारुख यांच्यासाठी सोलापुरातील सर्वकाही संपले होते. पत्नीच्या उपचारासाठी मित्रांनी आर्थिक मदत केली पण पत्नी नाही वाचली. केलेल्या मदतीची परतफेड करून पत्नीच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून आसामहून पुन्हा सोलापुरात आल्याचे फारुख यांनी जड अंतकरणाने सांगितले.
कोरोनाच्या हल्ल्यात वयस्कर माणसं गेली तर फारसं दुख: होत नाही. पन्नाशीच्या आतील कर्ती माणसं कोरोना खाऊ लागला तर त्या कुटुंबाची अगणित हानी होते. दहा वर्षांपासून बाळे परिसरात राहणाऱ्या फारुख यांना सोलापूर व परिसराची ओळख झाली होती. दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह आसाममधीलच वाहिदा यांच्याशी झाला. अवघ्या दीड वर्षांचा त्यांचा संसार कोरोनाने मोडला आहे. ताप आणि सर्दीचा त्रास होतोय म्हणून त्यांनी सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी पत्नीला दाखल केले. पंधरा दिवस त्यांनी कोरोनासोबत संघर्ष केला. शुगर वाढल्याचे कारण झाले आणि अवघ्या वीस वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला.
पंधरा दिवसांच्या उपचारासाठी रुग्णालयाने चार लाखांचे बिल केले. शासन जाहिरात करत असलेल्या महात्मा फुले आणि प्रधानमंत्री योजनाही फारुख यांच्या कानावर पडल्या होत्या. या लाभ मिळतो का? हे पाहण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि सोलापूर महापालिकेत हेलपाटे मारले. पत्नीला कोरोना झाल्याचे ओझे मनावर घेऊन त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न केला परंतु त्यांना तेथेही निराशाच मिळाली. शासन गाजावाजा करत असलेल्या या योजनांचा लाभ सहजासहजी कोणालाही मिळत नसल्याचा वाईट अनुभव त्यांना या प्रसंगी आला. पत्नीच्या मृत्यूची खबर मिळाली अन् आयुष्यातील मोठ्या लढाईत त्यांना नियतीपुढे हार पत्कारावी लागली.
पत्नीच्या उपचारासाठी झालेला खर्च देणे भागच होते. शेवटी ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणच्या मालकाने आणि मित्रांकडून उसनवारी करून त्यांनी पत्नीच्या उपचाराचा खर्च दवाखान्याला दिला. पत्नीच्या निधनानंतर ते आसामला गेले. त्यांची पत्नी ही तिच्या आई-वडिलांसाठी एकुलती एक लेक असल्याने आपल्या मुलीचे शेवटचेही दर्शनही तिच्या आई-वडिलांना घेता आले नाही. तरुण मुलीचा कोरोनाने क्रुरपणे बळी घेतल्याचा धक्का तिच्या आईला बसला. तेव्हापासून त्याही आजारी आहेत. मुलीच्या विचारातून त्या आजही सावरत नाहीत. आसामला गेलेल्या फारुख यांनी पुन्हा सोलापूरला जाऊ नये, यासाठी सर्व नातेवाईकांनी त्यांना विनंती केली. पत्नीच्या उपचारासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्या मदतची परतफेड करुन मृत पत्नीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ते तीन हजार किलोमिटर वरुन पुन्हा सोलापुरात आले आहेत.
दीड वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर ज्या नवदांपत्यांनी सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. त्या स्वप्नांची कोरोनाने काही दिवसांमध्येच राखरांगोळी केली. पत्नी उपचार घेत असताना मी वारंवार दवाखान्यात जाऊन देखील मला कोरोना झाला कसा नाही?, पत्नीला शुगर, बीपी यासह कसलाच त्रास नसतानाही तिचा मृत्यू झाला कसा? या प्रश्नांनी फारुख यांच्या मनात कालवाकालव सुरू केली आहे. या प्रश्नांचे उत्तर ना रुग्णालयाने दिले ना शासनाने.
आसाम सरकारची मदत
आसाममधील जे नागरिक बाहेर इतर राज्यात आहेत त्यांच्यासाठी लॉकडाऊन कालावधीतील मदत म्हणून आसाम सरकारने दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये दिले आहेत. लॉकडाऊनच्या माध्यमातून स्वत:च्या कामावर आलेल्या संकटात आणि कोरोनाच्या माध्यमातून कुटुंबावर आलेल्या संकटात त्यांना शासनाकडून मिळालेली ही एकमेव शासकीय मदत आहे. कोरोना विरुध्दची व आयुष्याची सर्व लढाई ते स्वत: लढले. पैशासारखा पैसा गेला आणि माणूसही गेला. "कोरोना'ने त्यांच्या आयुष्याचे होत्याचे नव्हते केले. आयुष्यात पुन्हा उठून उभा राहण्यासाठी त्यांना समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींच्या मदतीची आता गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.