Padalkar-dhone
Padalkar-dhone 
सोलापूर

"आमदार पडळकरांनी बिरोबाला फसवले आता विठ्ठलाला फसवायला निघालेत !' धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये फूट 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचे हे ढोल बजाव आंदोलन केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे. कारण, दोन वर्षांपूर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षण प्रश्नी खोटी शपथ घेऊन त्यांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. त्यानंतर आता आरक्षण प्रश्नाचे नाटक करत विठ्ठलाची फसवणूक करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन करत आहेत, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. धनगर आरक्षण प्रश्नावरून धनगर समाजाच्या नेत्यांमध्येच आता फूट पडल्याचे आज स्पष्ट झाले. 

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. 25) आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारच्या विरोधात "ढोल बजावो, सरकार जगावो' आंदोलन पुकारले आहे. पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घालून आमदार पडळकर राज्य सरकारच्या विरोधात ढोल वाजवणार आहेत. पंढरपुरात आमदार पडळकरांच्या समर्थकांनी आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. 

अशातच आज धनगर समाजाचे विक्रम ढोणे यांनी आमदार पडळकर यांच्यावर निशाणा साधत, त्यांचे हे आंदोलन फसवे असल्याची टीका केली आहे. श्री. ढोणे म्हणाले, आमदार पडळकर यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. आंदोलन करून त्यांनी केवळ राजकीय स्वार्थ साधला आहे. त्यामुळे पडळकरांना आता आंदोलन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांचे हे आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. 

आमदार पडळकर यांनी दोन वर्षांपूर्वी आरेवाडी (जि. सांगली) येथे दसरा मेळाव्यात आरक्षण मिळवून देतो असे सांगत, बिरोबाची शपथ घेतली होती. काही दिवसांतच ते बिरोबाची शपथ विसरून गेले. आता दोन वर्षांनंतर त्यांना धनगर समाजाचा पुळका आला आहे. त्यांनी फक्त राजकीय स्वार्थासाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातून समाजाला कोणताही फायदा होणार नाही. भाजप प्रणीत आंदोलनामध्ये धनगर समाजाच्या तरुणांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही श्री. ढोणे यांनी केले आहे. 

पोलिस बंदोबस्तात पार पडली ढोणे यांची पत्रकार परिषद 
विक्रम ढोणे हे आज आमदार पडळकरांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती आमदार पडळकर समर्थकांना मिळताच, समर्थकांनी येथील इंदिरा गांधी चौकातील पत्रकार भवनासमोर मोठी गर्दी केली होती. पत्रकार परिषदेत गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी पडळकर समर्थकांना तेथून जाण्यास सांगितले. त्यांतर उशिरा श्री. ढोणे हे पत्रकार भवनामध्ये दाखल झाले. 

पत्रकार परिषदेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पत्रकार भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस बंदोबस्तामध्येच विक्रम ढोणे यांना घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन पंढरपुरातून काढता पाय घ्यावा लागला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT