चिक्कोडी : कुस्तीच्या क्षेत्रात हिंद केसरी हा अत्यंत मानाचा किताब आहे. सन 1959 साली पहिल्यांदा हा किताब पटकावण्याचा मान पैलवान श्रीपती खंचनाळे यांना मिळाला. चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावाने हा पहिला हिंद केसरी पैलवान देशाला बहाल केला. त्यांचे कोल्हापूर येथे सोमवारी (ता. 14) निधन झाले. त्यांचे सहकारी, जुन्या काळातील कुस्तीगीर व कुस्ती शौकिनांतून आठवणींना दिवसभर उजाळा देण्यात आला.
श्रीपती खंचनाळे यांचा जन्म 1934 मधील. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती.
वडील यल्लाप्पा आणि आई काशाबाई यांनीही त्यांना कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले. आईंचे लवकर निधन झाल्याने त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर मामाच्या गावी बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथे त्यांची पहिले ते पाचवीपर्यंत शाळा झाली. शरीरयष्टी चांगली असल्याने व शाळेत गोडी नसल्याने वडिलांनी त्यांना पूर्णवेळ कुस्तीच्या आखाड्यात उतरवले. अकराव्या वर्षापासूनच एकसंबा गावातील तालमीत त्यांचा सराव सुरू झाला.
परिसरातील कुस्त्यांमध्ये बाजी मारू लागल्याने त्यांचे नाव लवकर प्रकाशझोतात आले. एकसंब्यात वस्ताद श्रीपती हिरेकुडे यांनी खंचनाळे यांना सुरुवातीला कुस्तीचे धडे दिले. श्रीपती खंचनाळे यांचे वडील यल्लाप्पा यांनी अचानक एकेदिवशी श्रीपती यांना घेऊन कोल्हापूरसाठी कुस्तीचे धडे देण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर असल्याने त्यांनी कुस्तीसाठी थेट कोल्हापूर गाठले. साधारण 1948-49 पासून त्यांची कोल्हापुरातील कुस्तीची घोडदौड सुरू झाली.
शाहुपुरीतील तालमीत त्यांचे पैलवानकीचे धडे सुरू झाले. याकाळात त्यांना अनेक नामवंत वस्ताद भेटले. त्यात लाहोरचे अन्वर पंजाब यांच्याकडूनही कुस्तीचे धडे मिळाले. बालपणी गावात, शेतात फिरणारे श्रीपती कोल्हापुरात कायमचे स्थायिक झाले अन कुस्ती म्हणजे जीवन हे ब्रीद घेऊन जगले. गावाकडे कधी आलेच तर जुन्या आठवणी सांगताना त्यांचा कधी वेळ जायचा हेही समजायचे नाही, अशा आठवणी त्यांचे एकसंबा येथील मित्र सांगत होते. खंचनाळे यांची सार्वजनिक मोठी कुस्ती अक्कोळमध्ये रंगा पाटील यांच्याशी झाल्याचेही गावकरी सांगतात.
गावात शेती असूनही केवळ कुस्तीसाठी त्यांचे कुटुंब कोल्हापूरला स्थायिक झाले. कोणतीही इतर नोकरी वा अन्य काम न करता त्यांनी केवळ कुस्तीवर भर दिला आणि देशभर गावचा नावलौकीक केला. त्यांचे एकसंबा येथे असलेले घर जीर्ण झाल्याने अलीकडेच त्याचे बांधकाम करून व्यवसायासाठी वापर केला जात आहे. गावामध्ये लहानपणापासून त्यांचा मित्र परिवार मोठा होता. एकसंबाचे रामू गारगोटे, तुकाराम पवार, रत्नाप्पा बाकळे, दत्तू मोपगार, सत्तर बुट्टे, सरदार मकानदार, संभा सातवर हे त्यांचे कुस्तीतले मित्र होते. भागातील अनेक कुस्त्या त्यांनी गाजवल्या.
खंचनाळे यांच्यामुळे या भागात कुस्ती प्रकाशझोतात आली. कितीही दूरवर कुस्तीचा आखाडा असला तरी भागातील त्यांचे शौकीन हजेरी लावायचेच. मलिकवाडचे आप्पा करजगे (हनिमनाळे) हेही खंचनाळे यांचे कुस्तीततले स्नेही होते. वर्षापूर्वीच त्यांचेही निधन झाले आहे. या भागात आल्यानंतर खंचनाळे हे करजगे यांच्या घरीही भेट द्यायचे. या भागातील मित्र परिवार, शिष्यगण यांच्याकडून आज केवळ आठवणी जागवण्याचे काम दिवसभर गावात दिसले. गावात अनेक चौकात त्यांच्या शोकसंदेशाचे फलक झळकत होते.
एकसंबा गावचा लौकिक देशभर
पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करून 1959 साली हिंदकेसरी किताब पटकावलेल्या श्रीपती खंचनाळे यांनी आयुष्यभर कुस्तीची सेवा केली. त्यातून त्यांनी एकसंबा गावचा लौकिक देशभर केला. कोल्हापुरात कुस्तीचे धडे सुरू झाल्याच्या साधारण दहा वर्षांतच त्यांनी हे करून दाखविले होते. त्यावेळी कोल्हापूरसह एकसंबा भागातही जल्लोष करण्यात आला होता.
"श्रीपती खंचनाळे आमचे बालपणापासून स्नेही होते. 1949 च्या दरम्यान ते कोल्हापूरला कुस्तीचे धडे घेण्यासाठी गेले. त्यांनी देशात कुस्तीचे आणि एकसंबा गावाचेही नाव उज्जवल केले."
- रत्नाप्पा बाकळे, एकसंबा
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.