पश्चिम महाराष्ट्र

#Specialtyofvillage पीर ग्रामदैवत असणारे म्हाळुंगे तर्फ ठाणे गवळ्यांचे गाव

राजेंद्र दळवी

ऐतिहासिक मसाई पठाराच्या कुशीत, डोंगर कपारीत वसलेलं म्हाळुंगे तर्फ ठाणे. पायथ्यावरून एखाद्या नवख्या माणसास या डोंगरकपारीत गाव आहे, असे सांगितले तर त्याचा विश्‍वासच बसणार नाही. आजपर्यंत या गावात कधी एसटी बस गेली नाही. फक्त गवळी समाजाची लोकवस्ती असलेले अवघ्या ६० घरांचे व ३४५ लोकसंख्या असलेले एकाच गल्लीचे छोटेसे गाव. गाव हिंदू गवळी समाजाचे असूनही ग्रामदैवत हजरत पीर बुऱ्हान साहेब आहे. 

ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्‍चिमेला विस्तीर्ण मसाई पठाराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे म्हाळुंगे तर्फ ठाणे छोटेखानी गाव. पन्हाळगडाला दिलेल्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेण्यासाठी जो खुश्‍कीचा मार्ग अवलंबला तो शिवकालीन मार्गही याच गावातून जातो. गावात गवळी समाजाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही समाजाचे घर नसल्याने उरुसासाठी पन्हाळा सोमवार पेठेतील मुस्लिम समाजाचे शकील देसाई यांना धार्मिक विधींसाठी बोलवले जाते. त्यासाठी देसाई यांना आजही गावातून बैते म्हणून दरवर्षी धान्य दिले जाते. गावाने आजही पूर्वीप्रमाणे बारा बलुतेदारांना बैते म्हणून दरवर्षी धान्य देण्याची परंपरा जोपासली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले गाव आजही त्यांच्याच सर्व धर्म समभाव या शिकवणीवर चालते. येथे दरवर्षी होणारा हजरत पीर बुऱ्हान साहेब या ग्रामदैवताचा उरूस त्याचेच उदाहरण आहे. गावात रस्ता नव्हता, त्यावेळी येथील गवळी समाजाने वाळू, सिमेंट, फरशी असे बांधकाम साहित्य पन्हाळ्यावरून डोक्‍यावरून आणून हजरत पीर बुऱ्हान साहेबांच्या तुरबतीचा जीर्णोद्धार केला आहे. आजही येथे दोन दिवस होणारा उरूस सर्वजण एकजुटीने गावची सार्वजनिक यात्रा म्हणूनच साजरा करतात. उरूस काळात पहिल्या दिवशी संदल (गंधलेपन) होतो. दुसऱ्या दिवशी गलेफाचा कार्यक्रम होतो.

गावातील आबालवृद्ध त्यात भक्तिभावाने सहभागी होतात. गावातीलच पारंपरिक लेझीम मंडळ, भजनी मंडळ, भेदिक शाहिरी मंडळ आपापल्या कला सादर करतात. गावात कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी बुऱ्हान साहेबांचा आशीर्वाद घेतला जातो. नव वर आणि वधूची वरात प्रथम हजरत पीर बुऱ्हान साहेबांचे आशीर्वाद घेऊनच घरी जाते.

येथील शेतीही उतारामुळे पावसावर अवलंबून आहे. लोकांनी उदर निर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय जपला. पूर्वीतर संपूर्ण पन्हाळगडाला याच गावातून दूध पुरवठा तीन ते चार किलोमीटर पायपीट करत डोक्‍यावरून केला जात असल्याचे येथील ८५ वर्षांचे सदाशिव पोरे सांगतात. लोकांचे कष्ट पाहून गावातील पहिले पदवीधर गजानन सखाराम महाडिक यांनी १९९३ मध्ये दूध संस्था स्थापन केली. शेती, दूध उत्पादन या बरोबरच हमाली करून ग्रामस्थांनी पुढील पिढीला येथील सरकारी शाळेत व नंतर पन्हाळा येथे हायस्कूलमध्ये शिक्षण दिले. त्याने गावाची प्रगती झाली. आज गावात १४ मालवाहतूक टेम्पो आहेत.

गवळी समाजाचे आराध्य दैवत म्हणजे राधाकृष्ण. म्हणूनच येथील मंडळाचे नाव राधाकृष्ण कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ असेच आहे. मंडळाच्या राजकारणविरहित सामाजिक कार्यामुळे गावाची वेगळी ओळख निर्माण झाली. गावात ‘एक गाव एक गणपती’ प्रथा आहे. मंडळाकडून गणेशोत्सवातील रकमेतून व लोकवर्गणीतून राधाकृष्णाचे मोठे मंदिर उभारले आहे. गावातील प्राथमिक शाळेसाठी वर्ग खोली, विद्यार्थ्याना बाकडी, संगणक दिला आहे. 

श्रमदानातून ग्रामविकास या संकल्पनेनुसार ग्रामस्थांच्या मदतीने प्राचीन मसाई मंदिराची रंगरंगोटी, शाळा व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्त व्यक्तींचा विशेष सत्कार, महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे असे एक ना अनेक उपक्रम होतात.

एकाच समाजाचे गाव असल्यामुळे संपूर्ण गाव एक कुटुंब म्हणूनच नांदत आहे. गावातील सारेच एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. गावातील एकीमुळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. तंटामुक्त गाव असा आमचा लौकिक आहे.
- प्रियांका महाडिक,
सरपंच

सर्व ग्रामस्थांची ग्रामदैवत हजरत पीर बुऱ्हान साहेब यांच्यावर नितांत श्रध्दा आहे. ग्रामस्थ दर गुरुवारी तेथे दर्शनासाठी जातात. चार पिढ्यांपासून आमचे घराण्याकडे येथील धार्मिक विधी करण्याचा मान आहे.
- शकील देसाई,
मुल्ला, हजरत पीर बुऱ्हान साहेब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT