नगर ः ""जगभरात "कोरोना व्हायरस'ने धुमाकूळ घातला असला, तरी नगर जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही. प्रशासनाने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांनी "कोरोना'ची धास्ती घेऊ नये. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू,'' असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात "कोरोना' आजाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेत द्विवेदी बोलत होते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ""नगरमधील एकाच कुटुंबातील चौघे दुबईतून एक मार्चला येथे आले. विशिष्ट देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे "स्क्रिनिंग' विमानतळावर सुरू होते. त्यात दुबईचा समावेश नव्हता. त्यामुळे या चौघांची "स्क्रिनिंग' झाली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याविषयी नाहक चुकीचे संदेश पसरविले गेले. त्यांना "कोरोना'ची लागण झालेली नाही. प्रशासनानेही या चौघांची तपासणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दक्षता घेण्याची सूचना केली आहे.https://www.facebook.com/nagar.esakal.3/videos/114020306875324/जिल्हा शासकीय रुग्णालय, बूथ हॉस्पिटल, शिर्डी व शिंगणापूर येथे दक्षता कक्ष स्थापन केले आहेत. एकूण 95 बेडची व्यवस्था केली आहे. सध्या परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे "स्क्रिनिंग' केले जात आहे. आगामी यात्रा, जत्रांच्या अनुषंगाने प्रातांधिकारी, तहसीलदारांना संबंधित देवस्थानाशी संपर्क साधून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत,'' असे द्विवेदी म्हणाले.
"मास्क' वापरण्याची गरज नाही
"कोरोना' आजारासाठी डॉक्टर, पेशंट सोडून कुणालाही "मास्क' वापरण्याची गरज नाही. आवश्यकता असल्यास साधा रुमाल वापरला, तरी भीतीचे कारण नाही. तसेच साबणाने नियमित हात धुणे महत्त्वाचे आहे, असे द्विवेदी म्हणाले.
खबरदारीच्या उपाययोजना
- श्वसनाचा विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना काळजी घेणे
- हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत
- शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये
- फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत
- हस्तांदोलन टाळावे.
- चेहरा, नाकास वारंवार हाताने स्पर्श करू नये
- गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
104 टोल-फ्री क्रमांक
जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे विशेष कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांसाठी 104 टोल-फ्री क्रमांक आहे. कोरोनाविषयक शंका या क्रमांकावर विचारता येतील. हे कक्ष 24 तास कार्यरत असतील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरही कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.