सांगली ः बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत धडक मारलेल्या अभिनेता इरफान खान याचे काल (ता. 29) निधन झाले. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला असतानाच आज चित्रपटसृष्टीतील एक अद्वितीय अभिनेते, लाखोंची धडकन, चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी आली आणि कोट्यवधी लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला. ऋषी कपूर यांचे सांगलीशी थेट कनेक्शन काहीच नव्हते, मात्र त्यांच्या "लैला-मजनू' चित्रपटाने सांगलीत विक्रम नोंदविला.
सन 1976 मध्ये लैला-मजनू चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात ऋषी कपूरबरोबर रणजिता ही अभिनेत्री झळकली. सोबतीला होती त्या काळातील तगडी स्टारकास्ट. त्या वेळी प्रताप आणि स्वरूप चित्रपटगृहांचा बोलबाला होता. लैला-मजनू चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. त्याविषयी चित्रपटगृहांचे मालक सतीश चाफळकर म्हणाले, ""ऋषी कपूर त्या काळात लाखो दिलांची धडकन होते. त्यांचा चित्रपट पाहायला तिकीटबारीवर रांगा लागायच्या. स्वरूप चित्रपटगृहात हा चित्रपट "सिल्व्हर ज्युबिली' ठरला. येथे तिसरा खेळ 26 आठवडे चालला होता आणि प्रताप चित्रपटगृहात तिसरा खेळ 27 आठवडे चालला. हा त्या काळातील मोठा विक्रम सांगलीत झाला.''
श्री. चाफळकर म्हणाले, ""कर्ज, प्रेमरोग, दिवाना या चित्रपटांनी आमच्या चित्रपटगृहात तुफान व्यवसाय केला. ऋषी कपूर यांना कुठलीही भूमिका दिली तर ते एकरूप होऊन काम करायचे. बरेचसे चित्रपट संगीतप्रधान होते. महंमद रफी व त्यांचा आवाज खूप एकसारखा वाटायचा. त्यांच्या चित्रपटातील कव्वाली आजही डोळ्यांसमोर उभी राहते.''
इरफानदादा आमच्यासाठी फॅमिली मेंबर
इरफानदादा आमच्यासाठी केवळ एक स्टार नाहीये, तर फॅमिली मेंबरच आहेत. 1984 च्या एनएसडी बॅचचे ते विद्यार्थी. त्यामुळे ते आमच्यासाठी इरफानदादा. एवढी वर्षे झाली; पण त्यांनी स्कूलशी नातं तसंच ठेवलं होतं. स्कूलमध्ये जगभरातील ऍक्टिंग मेथड्स, स्टाईल्स शिकविल्या जातात. इरफानदादांची मात्र स्वतःची शैली. हीरोइझमला ब्रेक करीत त्यांनी ही शैली बनवली. तळागाळातील कलाकारांसाठी ते मोठा प्रेरणास्रोतच. दिसायला सामान्य असलेल्या नटाने अभिनयाच्या जोरावर थेट हॉलिवूडमध्येही झेप घेतली. त्यांचा अभिनय पाहण्यापुरता नव्हे तर अभ्यासाचा होता.
- पायल पांडे (विद्यार्थिनी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली)
इरफानच्या "एक्झिट'मुळे मोठ्या अभिनेत्याला मुकलो
अभिनेते इरफान हे समांतर आणि व्यवसायिक चित्रपटांच्या व्याख्येत कधीच अडकले नाहीत. या दोन्हीच्या पलीकडे गेलेले ते अभिनेते होते. वास्तववादी शैलीचा अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हीरोसारखा चेहरा नसतानाही त्यांनी चित्रपटातून ठाम भूमिका सादर केली. रंगभूमी असेल किंवा मालिकांमध्ये त्यांचा अभिनय प्रत्यक्ष पाहिला आहे. त्यांच्या "एक्झिट'मुळे आपण सर्वजण मोठ्या अभिनेत्याला मुकलो आहोत. संजीवकुमार आणि बलराज साहनी यांसारख्या दिग्गज अभिनेत्याच्या परंपरेतील अभिनेते म्हणून इरफान ओळखले जात होते.
- अभिराम भडकमकर (लेखक, दिग्दर्शक)
इरफान खाननंतर ऋषी कपूर यांचे निधन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी म्हणावी लागेल. इरफानने स्ट्रगल करून स्थान मिळविले होते; तर ऋषी कपूर परंपरेतून अभिनयात आले. परंतु, त्यांनी स्वतंत्र ओळख आणि क्षमता सिद्ध केली. ऋषी यांचे चित्रपट पाहूनच आम्ही मोठे झालो. एक दिलदार माणूस म्हणून ते परिचित होते. त्यांची स्टाईल आणि अभिनय रसिकांच्या मनात कायम राहील. सेकंड इनिंगमध्येही त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे.
- रवींद्र कुलकर्णी (कलाकार)
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
सहा-सात वर्षांची असताना ऋषी कपूर यांचा चॉंदनी चित्रपट पाहिला. नंतर सहअभिनेते म्हणून असलेले चित्रपट पाहिले. त्यांचा सहजसुंदर आणि लोभनीय वावर सतत लक्षात राहिला. केवळ गोड दिसणेच नव्हे, तर अभिनयही अफलातून करीत असल्याचे लक्षात आहे. नंतर त्यांचे सर्व जुने चित्रपट पाहिले. ते पाहिल्यानंतर खूप काही शिकता आले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या भूमिका सतत स्मरणात राहतील.
- जुई बर्वे (अभिनेत्री)
चित्रपटसृष्टीची हानी न भरून येणारी
ऋषी कपूर हा माझा सर्वांत आवडता हीरो होता. अभिनयाच्या कलेद्वारे त्याने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. अभिनय आणि बहारदार गाणी या माध्यमातून त्यांची आठवण नेहमीच रसिकांना येईल. अतिशय देखणा नट सर्वांच्या मनामनांत बसला होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे चित्रपटसृष्टीची झालेली हानी न भरून येणारी असेल. इरफान खानपाठोपाठ ऋषी कपूरचे निधन म्हणजे चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी एक मोठा धक्काच मानावा लागेल.
- सर्जेराव गायकवाड (दिग्दर्शक, अभिनेते)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.