संकेश्वर - राष्ट्रीय महामार्गावर कणगलेजवळ मोटार व जीप यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील युवक-युवती जागीच ठार; तर एक जण जखमी झाला. प्रशांत कल्लाप्पा कोलागेरी (वय २२, रा. कमतनूर, ता. हुक्केरी) आणि श्रध्दा तेलसंगमठ (वय २०, रा. अथणी) अशी मयतांची; तर नागराज चौगला (रा. आमनगी, ता. हुक्केरी ) असे जखमीचे नाव आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अपघातानंतर जीपचालक फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (ता. १५) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निपाणीहून संकेश्वरकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच १२, एफके ५८७७) संकेश्वरहून निपाणीकडे जाणाऱ्या मालवाहू जीपने (केए २२ डी ४२१९) या धडक दिली. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. मयत झालेले दोघेही मोटारीत समोरच्या सिटवर बसले होते; तर जखमी नागराज चौगले हा चालकाच्या पाठीमागील सिटवर बसला होता. प्रशांत व श्रध्दा या दोघांची मैत्री होती, तर नागराज हा प्रशांतचा मित्र होता. हे तिघेही निपाणीला जाऊन कमतनूरकडे परत येत असताना कणगला गावानजिक हॉस्टेलसमोर हा अपघात झाला. घटनास्थळी संकेश्वरचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद चनगेरी, पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी यांनी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. त्यामुळे पोलिसस्थानक व शवविच्छेदन केंद्रासमोर कमतनूरच्या नागरिकांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती.
मयत प्रशांत हा निडसोशी येथे डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण करून, म्हैसूर येथील टीव्हीएस कंपनीत नोकरी करीत होता. गेल्या मंगळवारी तो तब्येत ठिक नसल्याने आठ दिवसांची रजा काढून तो गावी आला होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्याच दिवशी मित्रांचा असा अंत मनाला चटका लाऊन जाणारा ठरला. त्यामुळे मयत दोघांच्याही मित्रांना अश्रू अनावर झाले होते.
दुभाजक बसविण्याची मागणी
महामार्गावरील कणगला गावानजिकच्या या ठिकाणी वरचेवर अपघात होत असतात. त्यामुळे अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. याची दखल घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दुभाजक बसविण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.