पश्चिम महाराष्ट्र

व्हॅलेंटाइन डे 2019 : ‘पहले प्यार की पहली चिठ्ठी’

सुधाकर काशिद

मने जपली तर प्रेमविवाह टिकतोच
आम्ही दोघे सेंट झेव्हियर शाळेला. साधारण १९७५ चा तो काळ. त्या काळात मुला-मुलींनी गप्पा मारत उभे राहण्याची चोरी होती. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी काही निमित्ताने क्षणभर जरी बोलला तरी त्याची चर्चा व्हायची. अशा परिस्थितीत केवळ नजरेतील भावच आम्हाला प्रेम व्यक्त करायला उपयोगी पडले. मी मराठा, तर सुस्मिता ख्रिश्‍चन. त्यामुळे प्रेमाला विरोध आम्ही गृहीतच धरला होता. परंतु, प्रेम केलयंच तर ते अखेरपर्यंत तडीस न्यायचे हा निर्धार पक्का होता. साधारण नववी, दहावीला सुरू झालेले आमचे प्रेम आजही टवटवीत आहे. आमची गांधीनगरला शेती आहे. जनावरे आहेत. अर्थमूव्हिंगची मशिनरी आहे. मी आणि सुस्मिता दोघेही यात लक्ष घालतो. आमची मुलगी पूजा तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची फॅशन डिझायनर आहे. आमचा प्रेमविवाह खूप सुखी विवाह आहे. विवाह प्रेमातून झालेला असो किंवा ठरवून झालेला असो, तो एकमेकांची मने जपली तरच टिकतो हेच सत्य आहे.

- सुस्मिता पोवार व विजय पोवार

चिठ्ठीत ‘आय लव्ह यू’नेच सुरुवात
मी लिंगायत. कट्टर धार्मिक कुटुंबातला. संगीता पंजाबी कुटुंबातली. खुल्या वातावरणात वाढलेली. कोल्हापुरात शाळेत असतानाच का माहीत नाही, कसे माहीत नाही; पण एकमेकांबद्दल प्रेमाची भावना घर करून गेली. परंतु, प्रेम व्यक्त करायची संधी मिळत नव्हती. त्यावेळी मोबाईल नावाचा प्रकारच नव्हता. घरात फोन होता; पण त्यावर मला कोणी फोन करायचा प्रश्‍नच नव्हता. फोनवर हक्क वडिलांचाच होता. मग आम्ही चिठ्ठी लिहून प्रेम व्यक्त केले. एक चिठ्ठी लिहिताना पन्नास वेळा कागद फाडले. ‘आय लव्ह यू’ने चिठ्ठीची सुरुवात व शेवट केला. आणि पुढे प्रेम शब्दात उमटू लागले. प्रत्यक्षात लग्नाची वेळ आली तेव्हा विरोध झाला. लिंगायत मुलगा पंजाबी मुलीशी लग्न हे कोणालाच पटत नव्हते. मात्र, आम्ही ते केले. आज दोघेही खासगी क्‍लास चालवतो. माझी बायको संगीता पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड व इंग्रजी अशा पाच भाषा बोलते. मुलेही चांगल्या टप्प्यावर आहेत. मुलगा अक्षय ऑस्ट्रेलियात आहे आणि मुलगी अर्पिताचे लग्न झाले आहे.

- राजेंद्र स्वामी व संगीता स्वामी

जातीच्या भिंती ढासळल्या
आम्ही दोघे फॉन्ड्री इंजिनिअर. जयसिंगपुरात फायमध्ये नोकरीस लागलो. एकमेकांचे स्वभाव जुळले. प्रेमात पडलो. नोकरी करता करता रुकडीत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. लायनर निर्मितीत दोघांनी मिळून नाव कमावले. मात्र, दोघेही बीई असून स्वतः राबणे सुरू ठेवले. कामाची दहा-दहा किलो वजनाची सॅंपल खांद्यावर घेऊन उद्योजकांना भेटत गेलो. कामे मिळवित राहिलो. मी मराठा व ती ब्राह्मण; पण प्रेमात जातीच्या भिंती कधीच ढासळून पडल्या. माझ्या व सुषमाच्या कष्टातून टफ कास्टिंग हा उद्योग सुरू ठेवला. आज सांगायला अभिमान वाटतो. रेल्वेची चाकेही आम्ही बनवतो. खूप मोठी झेप आम्ही घेतली; पण वर्षापूर्वी सुषमा या जगातून निघून गेली आहे. तिची खूप मोठी पोकळी जीवनात आहे.

- बाळासाहेब व सुषमा कडोलकर

प्रेमासाठी ती माहेराला मुकली
मी बेळगावात सेंट पॉल शाळेत, तर सरला सेंट झेव्हियर कॉन्वेंटला. आम्ही सगळे मुले-मुली घरापासून साधारण एक किलोमीटर चालत शाळेला जायचो. मी मराठा व सरला गुजराथी. दहावीला असताना तिच्या मैत्रिणींच्या पत्त्यावर प्रेम पत्र पाठवले. तिच्या मैत्रिणीने तिला दिले व आमचे प्रेम पुढे सुरू झाले. मी इंजिनिअरिंगला असताना सरला दुसऱ्याच्या नावाने पत्र पाठवायची. आम्ही पळून जाऊन लग्न केले. आणि मी शिवाजी पेठेत खंडोबा तालमीजवळ एका खोलीत येऊन राहिलो. तिथल्या शेजाऱ्यांनी आधार दिला. आणि त्या आधारावर माझा इंजिनिअरिंगमधील ज्ञानाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला. आम्हाला चार मुले. प्रशांत इंजिनिअर आहे. वर्षा गृहिणी आहे. दीपा एम.आर्च. आहे. श्रीजीत कॉमर्सला आहे. आज कोल्हापुरातील एस. एस. मुचंडी ही कन्स्ट्रक्‍शन फर्म टॉपला आहे. फक्त दुःख एवढच आहे, की माझ्यासाठी माहेराला मुकलेल्या सरलाचा मृत्यू झाला आहे. मला खूप आठवण येते. त्या आठवणीवर जगत आहे. 

- सरला व शशिकांत मुचंडी

हॉर्न वाजला, की ती दारात यायची
मी रिक्षावाला. मी व गीता बावड्यात चौगुले गल्लीत राहायचो. ४० वर्षांपूर्वीचा तो काळ. पोरगा-पोरगी एकत्र बोलायचे म्हणजे गावभर दंगा व्हायचा. त्यामुळे प्रेम व्यक्त करणे खूप लांबचे. परंतु, माझ्या रिक्षाचा पाँम पाँम हॉर्न वाजला, की गीता घराच्या दारात यायची. व मनातलं सार न बोलताच सांगून जायची. आम्ही एकमेकाला भेटायलाही घाबरत होतो. पहाटे चार वाजता दत्ताच्या देवळातील घंटा आरतीसाठी वाजली, की आम्ही जागे व्हायचो. पहाटे भेटायचो. आज मी कोर्टात हेड बोलिफ आहे. गीता गृहिणी आहे. मुले नीलेश, शैलेश, दोन्ही सुना असा सुखी परिवार आहे; पण प्रेमाचे ते दिवस आठवले की आजही गुदगुल्या होतात, अशी परिस्थिती आहे.

- बबन पिसाळ व गीता पिसाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT