किल्लेमच्छिंद्रगड : नेत्यांचा निरुत्साह आणि कार्यकर्त्यांच्या कामात विघ्ने आणण्याच्या प्रवृत्तीमुळे वाळवा, शिराळा तालुक्यात जलसाक्षरता अभियान पिछाडीवर पडले आहे. लोकजागृतीसाठी प्रत्येक गावात एक जलसेवक नेमण्याचे शासकीय धोरण असताना ग्रामसेवकांच्या अनास्थेमुळे नेमणुका झाल्या नाहीत. काही गावांत नेमणुका झाल्या तरी त्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. "लॅबमध्ये चर्चा आणि लॅंडवर कृती मात्र शून्य' अशी अभियानाची अवस्था झाल्याची वस्तुस्थिती दिसते.
अभियानाचे अध्यक्ष असलेले प्रांताधिकारी आणि गावागावात अभियान पोहचवण्याचे उत्तरदायीत्व असलेल्या गटविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
शिराळा तालुक्यातील करमाळे येथे उगम पावलेल्या तीळगंगा नदीच्या पुनरूज्जीवनाचे काम पाच वर्षापूर्वी जलयुक शिवार योजनेच्या माध्यमातून सुरु झाले. लोकसहभागातून करमाळेच्या डोंगरावर काही ठिकाणी सिसीटी, डीप सिसीटीची, दगडी साखळी बांध घालण्याच्या कामासह गोळेवाडीपर्यंत नदीची साफसफाई करण्याचे काम झाले. पुढे नव्याने कोणतेही काम झालेले नाही. पुढचे पाठ आणि मागचे सपाट अशी कामाची अवस्था आहे.
जलसंपदा विभागाकडून क्षारपड जमीन सुधारणांसाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपयापर्यंत निधी देण्याची तरतुद केली असली तरी लोकसहभागाचा दहा टक्के निधी उभारून साखर कारखाने, उद्योगाकडील सामाजीक दायीत्वाचा (CSR) दहा टक्के निधी मिळविणे आणि ऐंशी टक्के शासकिय निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो पदरात पाडून घेणे, कामाची पुर्तता करणे हे एक आव्हान आहे. निधी मंजूर झाल्यानंतर राजकिय कार्यकर्ते या कामास कंत्राटी स्वरूप देण्याचा धोका अधिक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने काम होण्याची शक्यता कमी असल्याने योजनेच्या अभ्यासकांनी कामे पारदर्शक कशी होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
डोंगरात पाणी भुगर्भात साठा :
किल्लेमच्छिंद्रगडपासून कुंडलपर्यत पूर्वेकडील डोंगरभागात पाणी अडवण्याची, जिरवण्याची कामे हाती घेतल्यास भवानीनगर, लवंडमाची, बेरमाची, ताकारी, दुधारी, येडेमच्छिंद्र, किल्लेमच्छिंद्रगड येथील भुगर्भात पाणीसाठा वाढेल. विहीरी, कुपनलिकांची पाणी पातळी उंचावून पडीक जिराईत शेती बागायत होईल. रेठरेहरणाक्ष, ताकारी, नरसिंहपूर, शिरटे, कोळे, बहे, तांबवे येथील क्षारपड जमीन सुधारणेची कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यास जमीनीचे वाळवंट होण्यापासून रोखले जाईल. लोकांना संघटित करण्यासह शासकीय निधीसाठी पाठपुरावा करण्याचे शिवधनुष्य कार्यकर्त्याना पेलावे लागेल.
योद्धे चक्रव्युहात :
जलसाक्षरता व जागृतीसाठी पुढाकार घेवून काम करणाऱ्या जलयोध्दा प्रकाश पाटील यांना स्थानिक राजकारणामुळे काम करण्यात अनंत अडचणी येत आहेत. त्यांना पुढे काम करणे अशक्य बनले आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.