पिंपरी : कोरोनामुळे निधन झालेल्या महापालिका सेवातील १३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. वारसांना महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे. तसेच, कोरोना सुरक्षा कवच योजनेनुसार रक्कम देण्यासाठी तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी स्थायी समितीने बुधवारी मंजूर केला, अशी माहिती सभापती डॉ. नितीन लांडगे यांनी दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्षस्थानी अॅड. लांडगे होते.
महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयांना व विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणाऱ्या सुमारे १८ कोटी ६८ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांसह शहरातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या, कर्णबधीर व १०० टक्के अंध नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवास करण्याचा पीएमपीचा मोफत पास देण्यास मान्यता दिली आहे. एकूण दोन हजार ४०४ पाससाठी दोन कोटी २० लाख रुपये पीएमपीला दिले जाणार आहेत. तसेच, महापालिका हद्दीतील एचआयव्हीबाधीत व्यक्तींनाही मोफत बसपास देण्यास मान्यता देण्यात आली. मासुळकर कॉलनी पेव्हिंग ब्लॉकसाठी २२ लाख, डांबरीकरणासाठी २९ लाख, किवळेतील रस्ते डांबरीकरणासाठी २८ लाख, प्रभाग पाचमधील सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीसाठी ३० लाख, प्रभाग २१ मधील रस्त्यासाठी ३० लाख, थेरगाव-चिंचवड दरम्यान पुल बांधण्यासाठी ६२ लाख, महापालिका शाळा इमारतींच्या दुरुस्तींसाठी ५१ लाख रुपयांच्या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.
तेरा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी कार्यरत महापालिकेच्या २३ कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. यातील १३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेनुसार २५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मृत कर्मचाऱ्यांमध्ये अनंत काळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेडगे (मजूर), शोभा भुजबळ (स्टाफनर्स), ज्ञानेश्वर जाधव (वॉर्डबॉय), भालचंद्र राऊत (एमपीडब्लू), मोहम्मद शेख (लिफ्टमन), सिध्दार्थ जगताप (उपलेखापाल), तानाजी धुमाळ, तायप्पा बहिरवाडे (रखवालदार), संभाजी पवार (शिपाई), अनिल ठाकूर (क्लिनर), साईनाथ लाखे (कार्यालयीन अधीक्षक) यांचा समावेश आहे. उर्वरित १० कर्मचाऱ्यांच्या वारसांनादेखील विमा रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे. कोरोना उपाय योजनेकामी कार्यरत महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे घेतलेले रोजंदारी, मानधनावरील नियुक्त कामगार यांचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यात येईल.
समितीद्वारे निर्णय
कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा निर्णय गेल्या नऊ जुलैच्या सभेत घेण्यात आला आहे. त्यानुसार, विमा सुरक्षा कवच योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून ५० लाख आणि महापालिकेकडून अनुकंपा तत्वावर नियुक्ती व २५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही तेव्हाच घेण्यात आला आहे. याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. याबाबतच्या धोरणाला सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्ट रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार कामगार कल्याण विभागाकडे संबंधित विभागप्रमुखांच्या शिफारशीसह प्राप्त झालेली १३ प्रकरणे सर्व कागदपत्रांसह समितीपुढे सादर केली होती. कागदपत्रांची तपासणी करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसास मंजूर धोरणानुसार कोरोना सुरक्षा कवच योजनेनुसार महापालिकेकडून प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यास समितीने मान्यता दिली आहे.
कोरोना कालावधीत काम करताना महापालिकेच्या २३ कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यापैकी १३ कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. त्यांना २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. अन्य सात कर्मचाऱ्यांच्या वारसांची कागदपत्रे तयार आहेत. त्यांनाही लवकरच मदत केली जाईल. तीन जणांचे कागदपत्रे तयार नाहीत. त्यांची कागदपत्रे तयार झाल्यास त्यांनाही अर्थसहाय्य केले जाणार आहे.
- उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.