पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड शहरात बड्या व लहान सोसायट्यांमध्ये ‘बॅचलर्स नॉट अलाउड’ असा फतवा काढला आहे. सोसायट्यांच्या गेटवरच ‘बॅचलर्स नॉट अलाउड’चे फलक झळकताना दिसत आहेत. विशेषतः वाकड, आकुर्डी, हिंजवडी, रावेत, पुनावळे या भागात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे सोसायट्यांना बॅचलर्स मुला-मुलींचा होणारा त्रास समोर येत असून, दुसरीकडे सोसायट्यांच्या फतव्यामुळे बॅचलर्सला मनपसंतीप्रमाणे राहण्यासाठी घर मिळणे अवघड झाले आहे. परिणामी, नाइलाजास्तव प्रत्येकाला पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून राहाण्याची वेळ येत आहे.
शहरात सोसायट्यांना अशा प्रकारे नव्याने नियमावली जाहीर करण्याचा अधिकार नाही. एखाद्या सोसायटीला नाहक त्रास झाला आहे किंवा गुन्हेगारीचा एखादा प्रसंग घडला आहे. अशावेळी, सोसायटी संगनमताने किंवा पोलिसांच्या सहकार्याने निर्णय घेवू शकते. दुसरीकडे, शहरातील सोसायट्यांमध्ये बॅचलर्सला प्रवेश न देण्याची काही कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये, बॅचलर्सच्या रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, बेशिस्त पद्धतीने होणारे वाहन पार्किंग आणि पार्ट्यांच्यावेळी होणारा म्युझिकचा त्रास सोसायटीधारकांना भेडसावत आहे. बरेचदा, मोठ्या सोसायट्या फ्लॅट भाडेतत्त्वावर देताना चार ते पाच किंवा त्याहून अधिक मुलांना एकत्रितपणे राहण्यासाठी परवानगी देत आहेत. अशावेळी, पैसा कमावण्याच्या हेतूने एका फ्लॅटमध्ये संख्येपेक्षा अधिक मुलांचा भरणा होत आहे. त्यामुळे, मुलांचे पार्ट्या व मस्ती करण्याचे प्रमाण वाढत आहे.
तसेच, मुलांमुलींचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्रित राहण्याचा प्रकारही अनेक सोसायट्यांना खटकत आहे. बरेचदा रात्री-अपरात्री महाविद्यालयीन व नोकरदार मुले-मुली फ्लॅटवर एकत्रित राहण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, अशा प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न सोसायट्या करत आहेत. परंतु, काही मुलांच्या उपद्रवी वागण्याचा त्रास इतर बॅचलर्सला सहन करावा लागत आहे.
आम्ही बाहेरील जिल्ह्यातून राहण्यासाठी येतो. तेव्हा बरेचदा आई-वडील, फॅमिली किंवा चांगली सोसायटी, नातेवाईक पाहून रुम घ्यायला लावतात. अशावेळी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यात अडचणी येतात. मुली एकमेकींना समजून घेत नाहीत. वाद होतात. शिवाय स्वतंत्रपणे अभ्यास व शांतता हवी असते. त्यामुळे, बॅचलर्सना अशा प्रकारे सोसायट्यांमध्ये एंट्री डावलणे चुकीचेच आहे.
- कोमल नळे, निगडी
मुलांना तर सोसायट्या गेटवरूनच विचारतात. सिंगल आहे की, विवाहित? त्यानंतर सोसायटीत प्रवेश देण्याचे ठरविले जाते. अनेक सोसायट्या रुम दिल्यानंतरही बरेच वाद घालतात. उशिरा आलो किंवा गावी गेलो त्याचीही अडचण अनेकांना होते. रुमवर मित्र-मैत्रिणी आले तरी, विचित्र पद्धतीने शेजारचे वागतात. ही मानसिकता बदलायला हवी. प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. सोसायटीत इतरांना त्रास होणार नाही. याची दक्षता घ्यायलाच हवी. मात्र, थेट बॅचलर्सला प्रवेशच नाही अशा पद्धतीने वागणूक देणे चुकीचे आहे.
- प्रथमेश पाटील, आकुर्डी
सोसायट्यांना कायद्यानुसार बॅचलर्स मुलांना डावलण्याचा तसा पूर्णत: अधिकार नाही. परंतु, आजकाल मुलांच्या रात्रभर होणाऱ्या पार्ट्या, मद्यपान करणे व मोठ्या आवाजात गाणी व नृत्य करणे याचा सोसायट्यांना नाहक त्रास होतो. सोसायट्यांनी देखील फ्लॅट भाड्याने देताना कमी मुलांना द्यावा. ज्यामुळे, इतरांना त्रास होणार नाही. व्यावसायिक पद्धतीचा अवलंब फ्लॅटधारकांनी करणेही चुकीचे आहे.
- तेजस्विनी ढोमसे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ हौसिंग सोसायटीज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.