संतोष थिटे : सकाळ वृत्तसेवा
ऊर्से, ता. १० : पुणे जिल्ह्यात जवळपास ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. गेल्या पंधरा वर्षांत या पिकाचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून भाव ४१ रुपये प्रति किलो इतकाच स्थिर आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी भाव वाढेल, या आशेवर असलेले शेतकरी सध्या चिंतेत आहेत. तर, तत्काळ भाववाढ होईल असे दिसत नसल्याचे व्यापारी वर्गाकडूनही सांगितले जात आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मळणीसाठी आलेली सोयाबीन पावसाने ओली झाल्याने शेतकरी ओलसर अवस्थेतच मळणी करून बाजारात विक्रीस आणत आहेत. मात्र ओल्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने त्यांचे आर्थिक गणित विस्कळित झाले आहे. साठवून ठेवलेल्या मालाच्या बाजार भावाबाबतही असमाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थानातील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेंगा न भरणे, शेंगांमध्ये दाणे कमी असणे, तसेच मुसळधार पावसामुळे नुकसान अशी तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी नारायणगाव, चाकण, देहू येथे सोयाबीन विक्रीस नेत आहेत. नारायणगाव येथील व्यापाऱ्यांकडे सर्वाधिक माल जातो. सकाळपासूनच वाहने येथे रांगेत उभी असतात. वजन, दर आणि प्रत तपासणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ रोख पैसे दिले जातात. दररोज सरासरी १,५०० टन माल येतो, तर हंगामात सुमारे ३,५०० टनांची खरेदी होते.
सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये १८ ते २० टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. खरेदीसाठी मर्यादा १२ टक्के आहे. त्यामुळे आतापर्यंत कमी प्रमाणातच खरेदी झाली आहे. भरपूर पावसामुळे उतारा घटला असला, तरी दाणा चांगला भरलेला असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीनमधील ओलावा आणि
नऊ ऑक्टोबरचे भाव (प्रति क्विंटल):
प्रमाण (टक्के) - भाव
१०-११ -४१००
१२-१३ - ४०००
१४-१५ - ३९००
१६-१७ - ३८००
१७-१८ -३७००
१९-२० -३६००
मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनला ४१ रुपये भाव स्थिर आहे. सध्या भाव वाढतील अशी स्थिती नाही. सध्या आवक कमी आहे. मात्र, दिवाळीच्या आसपास आवक वाढण्याचा अंदाज आहे.
- अभय कोठारी, व्यापारी, नारायणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.