ऊर्से, ता. २७ : मावळ तालुक्यातील उर्से गावात चिमुकलीवरील अत्याचार आणि खुनाच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेला सतरा दिवस उलटूनही आरोपीला शिक्षा न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला लवकर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. २९) मावळ बंद ठेवण्याचा निर्णय अखंड मराठा समाजाने घेतला आहे. तालुक्यातील सर्व मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून उर्से ग्रामस्थ, अखंड मराठा समाज, सर्व पक्ष व विविध संघटनांच्यावतीने हा बंद पाळण्यात येणार आहे. याबाबत उर्सेमधील पद्मावती मंदिरात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी तळेगाव व उर्से खिंडीतील ज्योतिर्लिंग चौकात जमा होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----