भोसरी, ता. १५ ः भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसीतील काही विद्युत डीपी बॉक्सची झाकणे गायब झाली आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या या उघड्या डिपींमुळे लहान मुले आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. उघड्या विद्युत डीपीच्या केबलला धक्का लागून काही नागरिकांना यापूर्वी जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे, परिसरातील उघड्या विद्युत डीपींना झाकणे लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
डीपी बॉक्सची झाकणे ही लोखंडाची बनलेली असल्याने आणि ती सहज काढता येत असल्याने चोरट्यांद्वारे ही झाकणे काढून भंगारात विकली जातात. काही डीपींची झाकणे सदोष कडीकोयंड्यामुळे लागली जात नाहीत. तर बऱ्याच ठिकाणच्या डीपींची झाकणे असतानाही ते अर्धवट उघड्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळते.
भोसरी गावठाणातील मारुती मंदिराजवळ, पीसीएमसी चौकात महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाजवळ, जुने पोस्ट कार्यालयालगत, आदिनाथनगरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळेजवळील पदपथ, धावडे वस्तीतील कै. बोल्हू लांडगे मार्ग या एकाच रस्त्यावरील चार डीपींची दुरवस्था झाली आहे.
आणखी कुठे झाकणे गायब ?
- धावडे वस्तीतील पुणे-नाशिक महामार्गलगत हॉटेल प्रतीकसमोर
- गंगोत्री पार्कमधील सिल्वर लीफ ए विंगसमोरील रयत शिक्षण शाळेकडे जाणारा रस्ता
- दिघीतील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यान - फुगे वस्तीजवळ
- भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील इमारत क्रमांक ४८ व ४९ दरम्यान
- प्लॉट क्रमांक ४५६ लगतचे पदपथ
- भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉकमधील जे-७९ इलेक्ट्रो डीप कंपनी
- जे ब्लॉकमधील डब्ल्यू-२६१ शार्प टेक कंपनी
- सर्व्हे क्रमांक २४ साम्राज्य इंडस्ट्रियल इस्टेटजवळ
- दिघीतील काही रस्ते, धावडे वस्ती
डीपींमुळे झालेले अपघात
- चिंचवडमधील डांगे चौकातील उघड्या डीपीच्या संपर्कात आल्याने १३ जानेवारी २०१३ रोजी एका व्यक्तीचा मृत्यू
- पिंपळे सौदागरमधील कॉलनीतील उघड्या डीपीला स्पर्श झाल्याने १६ एप्रिल २०२३ला आठ वर्षांची मुलगी गंभीर भाजली
- सहा वर्षांपूर्वी चिखलीतील नेवाळे वस्तीमध्ये डीपीजवळील उघड्या केबलला चिटकून एका महिलेचा मृत्यू
- काही वर्षांपूर्वी भोसरीतील मिनी मार्केटजवळ महापालिकेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाच्या सीमाभिंतीजवळील उघड्या डीपी बॉक्सला चिकटून एक म्हैस दगावली
काय करायला हवे ?
- ठराविक दिवसांनी पाहणी करून धोकादायक विद्युत डीपी बॉक्स शोधून दुरुस्ती
- धोकादायक विद्युत डीपींची माहिती वेळोवेळी महावितरणला कळविणे
- डीपी बॉक्सची झाकणे सहज काढता येणार नाहीत, अशी त्यांची रचना करणे
- भंगार दुकान चालकांना डीपी बॉक्सची लोखंडी झाकणे विकत न घेण्याच्या सूचना देणे
- झाकणे चोरणाऱ्या चोरट्यांवर कडक कारवाई करणे
भंगारात विकण्यासाठी चोरट्यांद्वारे विद्युत डीपींची झाकणे काढली जातात. महावितरणद्वारे उघड्या विद्युत डीपी निदर्शनास आल्यास त्याला झाकणे लावली जातात. नागरिकांनी त्यांच्याजवळील परिसरातील उघड्या डीपींची माहिती दिल्यास त्यांना तातडीने झाकणे लावली जातील.
- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग
धावडे वस्तीतील काही डीपी जमिनीत अर्ध्या गाडल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या केबलही रस्त्याला लागून आहेत. त्यामुळे धावडे वस्तीतील नादुरुस्त अवस्थेतील विद्युत डीपींची तातडीने दुरुस्ती न केल्यास येथील नागरिकांद्वारे महावितरण विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.
- स्वप्निल लांडगे, स्थानिक नागरिक, धावडे वस्ती, भोसरी
इंद्रायणीनगरातील प्लॉट क्रमांक ४५६ मधील पदपथावर असलेल्या विद्युत डीपीचे झाकण गायब झालेले आहे. पदपथावरून विद्यार्थी, लहान मुले ये-जा करतात. त्यामुळे चुकून डीपीला धक्का लागल्यास त्यांच्या जीवितास धोका होईल.
- दिलीप काकडे, स्थानिक नागरिक, इंद्रायणीनगर, भोसरी