भोसरी, ता. १ ः भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरात रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे काही खड्डे दगड मातीने भरले आहेत; मात्र पावसाने हे खड्डे पुन्हा उघडे पडून दगड, माती रस्त्यावर विखुरली गेली आहे. त्यामुळे, वाहनांना प्रामुख्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
भोसरीतील दिघी रस्ता हा भोसरी-दिघीला जोडणारा जवळचा रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संत निरंकारी भवनासमोरील चढाचा रस्ता डोंगरवाट झाल्यासारखा वाटत आहे. लांडेवाडीतील महाराष्ट्र बॅंकेसमोर रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. याच रस्त्यावर असलेल्या पावसाळी वाहिनीच्या चेंबरची झाकणे नादुरुस्त होत असल्याने ती वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. बऱ्याच रस्त्यांवर खड्ड्यांतील खडी, माती रस्त्यावर विखुरली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघातही होत आहेत.
प्रमुख खराब रस्ते
- इंद्रायणीनगरातील गुळवे वस्तीवरून टागोर विद्यालयाकडे जाणारा रस्ता
- दिघीतील पंचशील बुद्धविहाराकडून सावंतनगरकडील रस्ता
- सह्याद्री कॉलनी क्रमांक तीनवरून आदर्शनगरकडे जाणारा रस्ता
- इंद्रायणीनगरातील इंद्रायणी चौकाकडून यशवंतराव चव्हाण चौकाकडे जाणारा रस्ता
- इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक आणि मोरया चौकातही खड्डे
- भोसरी एमआयडीसीतीलही विविध रस्ते
धोकादायक खड्डे; त्यात अंधाराची भर
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गावर लांडेवाडी चौक आणि एमआयडीसी चौक, सारस्वत बॅंकेसमोर खड्डे पडले आहेत. लांडेवाडी चौकात रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांसह चरही पडली आहे. त्यातच या रस्त्यावर एमआयडीसी चौक ते लांडेवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे हे खड्डे दिसत नसल्याने वाहनांना अपघात होऊन जीविताला धोका निर्माण झाला आहे.
धुळीचाही त्रास
भोसरीतील संत निरंकारी मंडळासमोरील रस्त्यावर खडी आणि माती विखुरली आहे. लांडेवाडीतील कॉम्रेट दादा रुपमय चटर्जी चौकातून बीएसएनएल कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा नेणाऱ्या ट्रकमधून राडारोडा रस्त्यावर सांडला जात आहे. वाळू, माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने गेल्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक कोंडीने वेळ वाया
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली दिसते. वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहन चालकांचा वेळ वाया जात आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर अधिक काळ वाहने सुरू ठेवावी लागत असल्याने इंधन वाया जाऊन आर्थिक नुकसानही होत आहे.
आता पावसाळा संपला असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करु नये. त्याऐवजी पक्के डांबरीकरण करावे. मोठ्या प्रमाणात खड्डे असणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
- सोमनाथ सुतारे, वाहन चालक
भोसरीत बऱ्यात रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवत असताना दुचाकीचा तोल जातो. त्यामुळे वाहने घसरतात. पिंपरी चिंचवड महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
- व्यंकटेश पंढरी, वाहन चालक.
इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी कसे बुजवता येतील ? याकडे लक्ष दिले जात आहे. येत्या दोन दिवसांत या कामाला सुरुवात होईल.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका
भोसरी, दिघी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करण्यात आलेली आहे. भोसरी, दिघी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला लगेच सुरुवात होणार आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.