भोसरी, ता. ४ ः भोसरी आणि दिघी रस्ता परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या परिसरातील विद्युत केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातील जुन्या झालेल्या विद्युत केबल बदलण्यासह विद्युत पुरवठा अखंडित राहण्यासाठी महावितरणद्वारे योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
खंडित वीजपुरवठ्याने नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, दूध डेअरी चालक, गृहिणी यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याबद्दल विजय कांबळे, शशिकला ओव्हाळ, राजेंद्र डोळस आदी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घरातील पंखे बंद राहिल्याने लहान मुलांना उष्णतेचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे करमणुकीची साधनेही बंद राहत असल्याने अबालवृद्धांची गैरसोय होत आहे. याखेरीज दुग्धजन्य पदार्थ ठेवलेले फ्रीजमध्ये बंद ठेवले जातात. मात्र विजेअभावी विक्रीवरही परिणाम होत असल्याची माहिती या परिसरातील एका डेअरी चालकाने दिली.
कुठे वीज गायब ?
- भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील दिघी रस्ता, सॅंडवीक कॉलनी, आदर्शनगर, गवळीनगर, गंगोत्री पार्क, चक्रपाणी वसाहत आदी परिसर.
विद्यार्थ्यांचीही गैरसोय
स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ऑनलाइनही क्लास करतात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांना अभ्यास करण्यातही अडचणी निर्माण होत आहेत.
दिघी रस्ता परिसराची पाहणी करून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या कारणाचा शोध घेतला जाईल. ती समस्या सोडवून या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जाईल.
- विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे परिमंडळ
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे दिवसाआड पाणी सोडले जाते. मात्र ज्या दिवशी पाणी येते. त्याच दिवशी विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो. बुधवारी (ता. ४) पाणी आले. नेहमीप्रमाणे आजही विद्युत पुरवठा खंडित झाल्याने इमारतीवरील टाकीत पुरेसे पाणी चढविता आले नाही. गेल्या एक वर्षापासून अशीच परिस्थिती असल्याने समस्या वाढली आहे.
- दिलीप ओव्हाळ, नागरिक, आदर्शनगर, भोसरी
गेल्या शुक्रवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होता. रविवार (ता.१) मंगळवार आणि बुधवारीही अशीच परिस्थिती होती. माझी मुलगी ‘वर्क फॉर्म होम’ काम करते. खंडित विद्युत वीजपुरवठ्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- दीपक महाडीक, नागरिक, राधानगरी, भोसरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.