संजीत देवकर ः सकाळ वृत्तसेवा
चऱ्होली, ता. २७ ः चऱ्होली - वडमुखवाडी परिसरातील तापकीर चौक हा प्रचंड वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला असून प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चौकातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यामध्ये मोठमोठे ट्रक, कंटेनर आणि अवजड वाहने सतत धावत असतात. अनेकवेळा ही वाहने रस्त्यावरच बंद पडतात. परिणामी, मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि काही वेळात संपूर्ण परिसर ठप्प होतो.
चऱ्होली - वडमुखवाडी परिसरातील तापकीर चौक हा वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे.
या चौकातून दररोज हजारो वाहने मार्गस्थ होत असतात. गोडाऊन चौकमार्गे येणारी अवजड वाहतूक मरकळ रस्त्याकडे जाण्यासाठी याच चौकाचा वापर करत असते. मात्र, चौकातील रस्त्यांची रुंदी ही अत्यंत अपुरी असल्याने हा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठीच योग्य आहे. मात्र, मोठमोठी अवजड वाहने इथून धावत असतात.
त्यामुळे ही वाहतुकीची समस्या नाही; तर विद्यार्थी आणि महिलांच्या प्रवासाची सुरक्षा आणि आरोग्याची देखील समस्या बनली आहे.
प्राणघातक वाट
अलंकापुरम - तापकीर चौक व एन चौकाच्या दरम्यानचा रस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. रस्त्यांची दुरवस्था पाहता वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी तर हा रस्ता एक प्राणघातक वाटच ठरत आहे.
या चौकाजवळच शाळा असल्यामुळे दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत वाहतुकीची कोंडी शिगेला पोहोचते. शाळा सुटण्याच्या वेळेला पालकांकडून वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. यावेळी ना पालक नियम पाळतात. ना वाहतूक पोलिस हजर असतात.
वाहतूक कोंडीची कारणे
- अरुंद रस्ता, एकेरी ऐवजी दुहेरी वाहतूक
- वाहतूक नियंत्रक दिवे अनेकदा बंद
- झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्नसारख्या नियमांचे उल्लंघन
- रस्त्यांवरील असंख्य खड्डे
- सेवा रस्त्यावरील बेशिस्त वाहनचालक
नागरिकांच्या प्रमुख मागण्या...
- रस्त्याचे खड्डे बुजवून रुंदीकरण करावे
- अवजड वाहतुकीकरिता विशेष वेळ निर्धारित करावी
- बेशिस्त वाहन पार्किंगवर कठोर कारवाई
- सिग्नल यंत्रणेचे त्वरित दुरुस्तीकरण व देखभाल
- दुपारच्या वेळेतही वाहतूक पोलिसांची हजेरी सुनिश्चित करणे
- सेवा रस्त्यावर वाहतुकीचे नियम व शिस्तीचे पालन करून घेणे
दररोज सकाळी आणि संध्याकाळी तापकीर चौकातून ऑफिसला जाणे म्हणजे छातीत धडधड वाढवणारा अनुभव असतो. कधी एखादा कंटेनर बंद पडलेला असतो; तर कधी खड्ड्यांमध्ये चुकून पडायला लागते. पावसात तर हा रस्ता जीव घेईल की काय, अशी भीती वाटते. शाळा सुटल्यावर तर सगळा परिसर गोंधळलेला असतो. पालकांची वाहने रस्त्यातच उभी असतात आणि त्यावर कोणीही कारवाई करत नाही. आम्हा सामान्य माणसांनी काय रोजची संकटे सहन करतच जगायचे का ?
- स्वाती देशमुख, शिक्षिका
तापकीर चौकात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अरुंद रस्ता आणि वाहनचालकांची बेशिस्त वागणूक. पालक, ट्रकचालक आणि स्थानिक वाहनचालक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची दुपारी १ ते ४ या वेळेत विश्रांती असते. मात्र, ही वेळ वगळता दिवसभर कर्मचारी उपस्थित असतात आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असतात. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरवस्था लक्षात घेता पीडब्ल्यूडी विभागाला पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. लवकरच त्यावर उपाययोजना होईल, अशी अपेक्षा आहे.
- सतीश नांदुरकर, पोलिस निरीक्षक
CHL25B00176, CHL25B00177
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.