चिंचवड, ता.१५ ः चिंचवडमधील केशवनगर येथील थिसेनक्रुप कंपनीतील कर्मचारी युवराज पाटील यांनी गडकिल्ल्यांवरील भटकंती, जंगलभ्रमंतीखेरीज लांब पल्ल्याच्या सायकलिंगचीही आवड जोपासली आहे. पुणे-कन्याकुमारी, पुणे-सोमनाथ यासारख्या मोहीमा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी नुकताच १ लाख किलोमीटर सायकलिंगचा टप्पाही पूर्ण केला आहे.
युवराज पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे-खालसा गावचे. आयटीआय शिक्षणानंतर १९९८ मध्ये नोकरीनिमित्त ते पुण्यात दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला गिर्यारोहणाची आवड जोपासली. गड-किल्ल्यांवर भटकंती करताना त्यांनी इतिहासाची माहिती मिळविली. व्यायामाची सवय लागली. जंगलभ्रमंती करताना वन्यजीव छायाचित्रणाची आवड निर्माण झाली आणि देशातील ताडोबा, पेंच, कान्हा अनेक राष्ट्रीय उद्याने त्यांनी अनुभवली.
कोरोना काळ टर्निंग पॉईंट
कोरोना काळ त्यांच्या हा सायकलिंग प्रवासाचा टर्निंग पॉईंट ठरला. एक जुनी साधी सायकल घेऊन सुरुवात केली तेव्हा, १०-२० किमी अंतर पार करतानाही दमछाक व्हायची. सुरुवातीला पुण्यातील दगडूशेठ गणपती, शंकर महाराज मठ, आळंदी, देहू, मोहितेवाडी, कात्रज बोगदा अशी ठिकाणे त्यांनी सायकलने गाठली. दर आठवड्याला लोणावळा रिटर्न १०० किमी ही त्याची सवय झाली. त्यानंतर तीन वर्षांपासून इंडो ॲथलेटिक सोसायटीची ते पंढरपूर सायकलवारी करत आहेत.
लांब पल्ल्याच्या प्रवासात त्यांनी पुणे - कन्याकुमारी १६०० किमीचा प्रवास कोणत्याही पाठबळाशिवाय पूर्ण केला. या प्रवासादरम्यान गोकर्ण, मुरुडेश्र्वर, गुरुवायर, पद्मनाभस्वामी मंदिर अशा धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुढे पुणे-सोमनाथ १२५० किमी आणि पुणे-उज्जैन-ओंकारेश्वर-त्र्यंबकेश्वर-पुणे असा १६५० किमीचा ज्योतिर्लिंग दर्शन प्रवास केला. हे प्रवास धार्मिक यात्रांसह त्यांच्या मानसिक व शारीरिक ताकदीची खरी कसोटी ठरले.
आतापर्यंतच्या या सायकल प्रवासात आनंद गुंजाळ, प्रदीप टाके, संदीप परदेशी, संतोष नखाते, बाळासाहेब तांबे, आनंद लोंढे यांची खूप साथ मिळाली. आयएएसचे गजाजन खैरे, अजित पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो. सायकलिंग, धावणे, चालणे, योगा किंवा गिरीभ्रमंती तो नियमित केला पाहिजे. देशातील नवनवीन स्थळांना सायकलद्वारे भेट देऊन पूर्ण भारतभ्रमण करण्याचा माझा संकल्प आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वासाने सामान्य माणूसही असामान्य ठरू शकतो.
- युवराज पाटील, सायकलपटू, चिंचवड
CWD25A02047
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.