चिंचवड, ता.२१ ः गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेच्या अभावामुळे इंदिरानगर, दळवीनगर परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. काही ठिकाणी चक्क दोन महिन्यांपासून ढीग उचलले गेले नाहीत; तर एके ठिकाणी ढीग कुजून गेला तरीही घंटागाडी आली नाही. कचरा संकलनाअभावी डास आणि उंदिर यांची संख्या वाढली आहे. डेंगी, हिवताप यासारखे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिंचवड येथील इंदिरानगर, दळवीनगर भागांत स्वच्छता अभियानाचा बोऱ्या वाजला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या रजा, दांड्या, घंटागाड्यांच्या अनियमित फेऱ्या यामुळे कचरा नियमित उचलला जात नाही. शिव मंदिराच्या मागील रस्त्यावर देखील वारंवार कचरा टाकला जात आहे. तेथील सफाई होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
आरोग्य विभागाचे ‘ओके, ओके’
कचरा व्यवस्थापनासाठी नियमित वेळापत्रक ठरवणे, घंटागाडी वेळेवर पाठवणे याला प्रशासनासाठी प्राथमिकता असायला हवी. मात्र, महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना यासंबंधी नागरिकांनी फोन केला असता फक्त ‘ओके, ओके असेच करत आहेत. मात्र, नंतर काहीच काम होत नाही. कचऱ्याचे ढिग उचलण्यासाठी घंटागाडी कधी येतच नाही. त्याकडे कोणा अधिकाऱ्याचे लक्ष नाही.
नागरिकांच्या मागण्या
- स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवावे
- परिसरामध्ये गवत, शेवाळ वाढलेले आहे, गवत काढून टाकावे
- एखादा सफाई कर्मचारी सुट्टीवर असेल; तर त्या ठिकाणी पर्यायी नेमणूक करणे
- त्यांच्याकडून वेळोवेळी सफाई करून घ्यावी
- घंटागाडीच्या सकाळ- संध्याकाळी अशा दोन वेळा निश्चित कराव्यात
- घंटागाड्यांकडून कचरा संकलन वेळेवर व्हावे
- वारंवार कचरा टाकला जातो, तेथे काही दिवस शिफ्टमध्ये ग्रीन मार्शलची नेमणूक करावी
शिव मंदिराच्या उजव्या बाजूचा रस्ता कधीच झाडला जात नाही. कधीतरी झाडलाच; तर तिथेच ढीग लावले जातात. दोन ते तीन महिने झाले. कचऱ्याचा ढीग उचलला नाही. तो कुजून गेला. परंतु कचऱ्याची गाडी अजूनही तो उचलण्यासाठी आली नाही. ठेकेदाराला कॉल केला की तो फक्त ‘ओके, ओके’ म्हणत असतो. पण, काम काही होत नाही. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने याची गांभीर्याने दखल घ्यावी"
- रवी घाटगे, स्थानिक रहिवासी
आमच्याकडील सफाई कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात. परंतु ते पाच दिवस सुट्टीवर गेले. तेव्हा, पाच दिवस कोणीही रस्ता साफ करण्यास आले नाही. त्यामुळे आम्ही स्वतः आमच्या घरासमोरील रस्त्याची साफसफाई केली. कचऱ्याचे ढीग साचून राहिले. पण, ते देखील उचलण्यासाठी आठवडाभर कोणीही आले नाही. तसेच घंटागाडी देखील कधी सकाळी, दुपारी तर कधी संध्याकाळी येते. नियमित कधी येत नाही.
- विश्वनाथ धनवे, स्थानिक रहिवासी
CWD25A02100