चिंचवड, ता.२३ ः सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांसाठी भारतीय टपाल विभागाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पूर्व विभागाच्यावतीने चिंचवड पूर्व उप टपाल कार्यालयामध्ये आता स्पीड पोस्ट, पार्सल तसेच पत्र बुकिंगची सुविधा सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
पिंपरी चिंचवड ही कामगार व औद्योगिक नगरी असल्याने येथील नागरिकांची दिनचर्या अत्यंत व्यस्त असते. कामाच्या वेळेत ठरावीक वेळेतच टपाल कार्यालय गाठणे, त्यांच्यासाठी अवघड ठरते. बहुतांश टपाल कार्यालये दुपारी तीन ते चारच्या सुमारास बंद होत असल्याने अनेक ग्राहकांना महत्त्वाची कागदपत्रे, पार्सल किंवा पत्रे वेळेत पाठविण्यात अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊनच चिंचवड पूर्व टपाल कार्यालयाने सेवा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू असल्याने देशभरात आणि परदेशातही नातेवाईकांना भेटवस्तू, मिठाई, वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे पाठविण्याची गरज वाढते. नवीन वेळापत्रकामुळे नागरिकांना कामकाजानंतरही टपाल सेवांचा लाभ घेता येईल.
प्रमुख फायदे
- सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत स्पीड पोस्ट, पार्सल व पत्र बुकिंगची सुविधा
- कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही
- कामगार,व्यावसायिक,विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर सेवा
- देशांतर्गत तसेच परदेशात वस्तू, कागदपत्रे आणि भेटवस्तू पाठविणे सुलभ
टपाल विभागाची स्पीड पोस्ट सेवा ही वेगवान, सुरक्षित व विश्वासार्ह मानली जाते. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही सेवा विस्तारित वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपयुक्त सेवांचा लाभ घ्यावा.
- कौशल कुलकर्णी, उपविभागीय डाक निरीक्षक
भारतीय टपाल विभागाच्या व्यवसाय वृद्धी मोहिमेअंतर्गत चिंचवड पूर्व टपाल कार्यालयांमध्ये ही सुधारित वेळ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकाभिमुख सेवा व व्यवसाय वृद्धी हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिक उद्दिष्टाने देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर पार्सल पाठवणाऱ्या व्यावसायिकांसाठी एक व्यावसायिक निर्यात हब तयार झाले आहे.
- समीर महाजन, प्रशासन अधिकारी, भारतीय टपाल सेवा, पुणे शहर पूर्व विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.