चिंचवड, ता.२८ ः पिंपरी चिंचवड शहर हे कष्टकरी, कामगार, विविध भाषा-संस्कृती आणि समाजघटकांना सामावून घेणारा ‘छोटा भारत’ म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील हजारो कुटुंबांनी रोजगाराच्या शोधात या औद्योगिक नगरीत आश्रय घेतला आणि शहरांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. अशा या कामगारप्रधान शहरांच्या विकासाशी आणि प्रश्नांशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवडने कष्टकऱ्यांचा खंबीर आधार गमावला.
पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी अजित पवार यांनी १९९१ पासून सातत्याने काम केले. नियोजनबद्ध विकासाचा ध्यास घेत शहराचा चेहरा-मोहरा बदलून दाखवला. जिथे कामगारांवर अन्याय होत असे. तिथे अजित पवार हे ठामपणे उभे राहत असत. टाटा मोटर्स, हिंदुस्तान अँटिबायोटिक्ससारख्या कंपनीतील अडचणी असोत वा हाफकिन कंपनीवरील संकट. प्रत्येकवेळी त्यांनी आर्थिक व प्रशासकीय मदत करून कामगारांचे हित जपले. उर्जामंत्री असताना वीजबिल सवलत, महानगरपालिकेमार्फत जकात माफी अशा निर्णयांमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला. अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले. तरी पिंपरी चिंचवडच्या विकासातील त्यांचे योगदान आणि कामगारांप्रतीची बांधिलकी कायम स्मरणात राहणार आहे.
अजित पवार हे कामगारांच्या हक्कांसाठी ते सदैव उभे राहिले. २०१० मध्ये कंत्राटी कामगार निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत आम्हाला मोलाचे बळ दिले. आज ते आम्हाला पोरके करून गेले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
- साजिद पठाण, सरचिटणीस, एसकेएफ एम्प्लॉईज युनियन
टाटा मोटर्समध्ये १९९९-२००० मध्ये पहिली ‘इंडिका’मोटार लॉन्च होत असताना कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि उद्योग टिकवण्यासाठी आम्ही टाटा मोटर्स कामगार संघटनेच्यावतीने त्यांच्याकडे करसवलतीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून टाटा मोटर्सला विक्री करात सवलत दिली. त्यामुळे उद्योग टिकून राहिला आणि हजारो कामगारांच्या रोजगाराला संरक्षण मिळाले.
- सुजित पाटील, कामगार नेते
अजित पवार हे शिस्तप्रिय, प्रशासनावर वचक ठेवणारे आणि कामगारांचे खरे पाठीराखे नेते होते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय प्रगती शक्य नाही, हे त्यांचे ठाम मत होते. तसेच कारखाने टिकले तरच कामगार आणि त्यांच्या संघटनांची उज्ज्वल प्रगती होईल, हा संदेश ते नेहमी देत असत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, कामगार सेल, पिंपरी चिंचवड शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.