जाधववाडी, ता. ६ ः अनेक सोसायट्यांना पिण्याचे पाणी आणि विजेच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. कचरा व्यवस्थापन नीट होत नाही. रस्त्यांची दुरवस्था झाली असूनही आम्ही प्रामाणिकपणे वेळेवर मिळकत कर भरत आहोत. मात्र, सरसकट सवलत न देता केवळ विशिष्ट भागासाठी मिळकत करात सूट देणे म्हणजे पक्षपात नव्हे का ? असा सवाल पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनने केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे रेडझोन बाधितांना मिळकत करात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे शहरातील प्रामाणिकपणे मिळकत कर भरणाऱ्या सोसायट्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार सोसायट्यांकडून केली जात आहे.
पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की,‘‘महापालिकेचे रस्ते म्हणजे चाळण झाली आहे. भटके श्वान रस्त्यावर फिरत असतात. अरुंद रस्ते, वाहतूक खोळंबा, खड्डे, फुटलेले चेंबर अशा अनेक समस्यांना तोंड देऊन सुद्धा सोसायटीधारक महापालिकेला कर भरत आहेत. परंतु फक्त रेड झोन बाधितांना सवलत दिल्यास पक्षपाती धोरणास चालना मिळेल. महापालिकेने आमचा विचार न करता अन्याय केला आहे. महापालिकेने त्वरित सोसायट्यांना मिळकत करात सूट द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.’’