लोणावळा, ता. १९ : लोणावळा परिसरात गेले काही दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. विस्कळीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
खोंडगेवाडी येथे रविवारी उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज बिघाड झाला असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. मात्र, सकाळी आठ तास वीज पुरवठा खंडित झाल्याने पावसाळ्यातील विजेचा लपंडावाला सुरुवात झाली की काय? असा प्रश्न नागिरकांना पडला. लोणावळ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.
व्यावसायिक समीर इंगळे म्हणाले, ‘‘लोणावळ्यात राहतोय की एखाद्या दुर्गम भागात राहतोय तेच कळत नाही. दररोज किमान ५ ते ७ वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. गेल्या महिन्याभरात दोनवेळा १२-१२ तास वीज नव्हती. महावितरणकडून लोणावळा शहरात प्रतिबंधात्मक देखभाल शून्य असल्याचे दिसत आहे. तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.’’
वीज गूल होत असल्याने ऑफिसची कामे तातडीने होत नाहीत. सरकारी कार्यालयातील सर्व्हर डाऊन होत आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामे होत नाहीत. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे ॲड. प्रफुल्ल लुंकड म्हणाले.
‘‘लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे पोल ते पोल तपासणी करावी लागत आहे. फिडरमध्ये बिघाड झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत आहे.
- एम. एस. अरगडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण
---