लोणावळा, ता. १६ : पुणे जिल्ह्यात अमली पदार्थांच्या उत्पादन, साठा, विक्री, सेवन व वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत लोणावळा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रेल्वे स्टेशनजवळील निजाम परिसरात गांजा विक्री करणाऱ्या सराईत इस्माईल कुरेशी (वय- ५८, रा. टेबलचाळ, लोणावळा) याला अटक करून त्याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा १.१७१ किलो गांजा जप्त करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पेट्रोलिंगदरम्यान कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली असून अमली पदार्थ नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पूजा गव्हाणे, फौजदार वीरसेन गायकवाड, हनुमंत वाळुंज, संदीप मानकर, संदीप डुंबरे, नागेश चोरगे, नागेश कामठणकर यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.