सकाळ इम्पॅक्ट
रावेत, ता. ६ ः किवळे ते समीर लॉन्स रस्त्यावरील धोकादायक खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्याचे काम बुधवारपासून अखेर सुरू करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थी आणि वाहनचालकांना यामुळे रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अपघातांची शक्यता वाढली होती आणि वाहतुकीस अडथळाही निर्माण होत होता. ‘सकाळ’ने या समस्येची गंभीर दखल घेत त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करुन संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. दिवसभर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू राहिले आणि अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले गेले.