रावेत, ता.१५ : मुकाई चौक परिसरातील कोहिनूर बिल्डिंगच्या समोरील मुख्य पदपथावर सध्या कचरा, राडारोडा आणि तोडलेल्या झाडांच्या फांद्यांचा मोठा ढीग साचल्यामुळे पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, पादचाऱ्यांना धोका पत्करुन रस्त्यावरून चालावे लागत आहे.
शहर सुंदर दिसावे यासाठी नागरिकांनीही जबाबदारी घ्यायला हवी. पण, महापालिका प्रशासनाने नियमितपणे कचरा उचलणे आवश्यक आहे, असे स्थानिक दुकानदारांनी सांगितले. पदपथ मोकळे करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पायवाट निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पदपथावर तोडलेल्या फांद्या, काही प्रमाणात कचरा आणि राडारोडा फेकल्यामुळे आम्हाला रस्त्यावरून चालावे लागते. हा रस्ता कायमच वाहतुकीने गजबजलेला असल्याने अपघाताची शक्यता वाढते. महापालिकेने तातडीने साफसफाई करावी.
- संदीप माने, स्थानिक नागरिक
पदपथावर झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे धोकादायक आहे. शिवाय परिसरात अस्वच्छता पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
- वर्षा काळभोर, नागरिक
NGI25B00852