निगडी, ता. २७ ः तळवडे गावठाण चौकातील ‘सिग्नल’चा वेळ कमी असल्याने ग्रामस्थांची कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.
तळवडे गावातील मुख्य चौक हा देहू-आळंदी, निगडी तसेच चाकण एमआयडीसीला जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या चौकातून दररोज हजारो वाहनचालक, औद्योगिक कामगार, तळवडे ग्रामस्थ तसेच देहू-आळंदी परिसरातील नागरिक प्रवास करतात. मात्र या चौकात बसवण्यात आलेल्या वाहतूक दिव्यांचा कमी सेकंदाचा कालावधी नागरिकांच्या गैरसोयीचा ठरत आहे.
चाकण एमआयडीसी मार्गे निगडीकडे तसेच चिखली मार्गे चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक दिव्यांचा कालावधी १३० सेकंदांचा आहे. मात्र निगडीकडून तळवडे गावात येताना तसेच जाताना वाहतूक दिव्यांचा कालावधी केवळ आठ सेकंदाचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकातील वाहतूक दिव्यांचा कालावधी वाढवणे आवश्यक आहे. वाहतूक प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेऊन या मार्गावरील वाहतूक दिव्यांचा कालावधी वाढवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तळवडे चौक हा वर्दळीचा आहे. येथील ग्रामस्थ याच रस्त्याने शेतीची अवजारे, चाऱ्याच्या पेंड्या व इतर जड सामान घेऊन जातात. हे सामान जड असल्याने सावकाश जावे लागते, मात्र सध्याचा कमी सेकंदाचा वाहतूक दिव्यांचा कालावधी अपुरा आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये वारंवार वाद होतात. वाहतूक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहतूक दिव्यांचा कालावधी वाढवावा.
- सचिन कुडपणे, तळवडे ग्रामस्थ