जुनी सांगवी, ता. ११ : श्रावण महिन्यानिमित्त दापोडी गावठाणातील शिवकालीन महादेव मंदिरात सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याचबरोबर जुनी सांगवी गावठाणातील महादेव मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
पुणे जिल्ह्याचे मध्यवर्ती गाव म्हणून ओळख असलेले तसेच पूर्वीचे शिवकालीनपूर्व दर्पपुडीका नाव असलेली सध्याची आजची दापोडी अनेक ऐतिहासिक वारसा जतन करत उभी आहे. सुमारे तीन गुंठे जागेवर शिवमंदिर आजही दिमाखात उभे आहे. दापोडी गावातील हे पहिले मंदिर आहे. मंदिराचे चुना मातीतील दगडी बांधकाम असून येथे भव्य दीपमाळ व मंदिराबाबत त्यावर कोरीव काम केले होते. मात्र, कालांतराने दीपमाळेची पडझड झाल्याने ती अस्तित्वात नाही. प्रवेशद्वारासमोर दगडामध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारावर मेघडंबरीत नंदीची प्रतिष्ठापना केलेली पाहायला मिळते. काळानुरूप गावकऱ्यांनी रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलेले आहे. शेजारीच पुरातन पिंपळवृक्ष मंदिराची साक्ष देत उभा आहे. चार दगडी खांबावर उभे असलेले मंदिर गाभाऱ्यात या खांबावरही देवतांची कोरीव चित्रे पाहावयास मिळतात.
साधू-संतांची तपोभूमी
आजच्या भोसरी गावाची पूर्वी भोजापूर या नावाने ओळख होती. भोजापूर राजाच्या नावावरून भोसरी हे नाव प्रचलित झाले. भोजापूर राजा घोड्यावरून दर्पपुडीका म्हणजे आजची दापोडी येथे या शिवमंदिरात पूजा करण्यासाठी यायचे. राजमाता जिजाऊंनी मंदिरास ताम्रपट अर्पण केलेला आहे. जवळच पवना, मुळा नद्यांचा संगम घनदाट अरण्य, निसर्गाच्या विपुलतेचा ठेवा, निसर्गरम्य ठिकाणामुळे तपश्चर्येसाठी साधू-संताचे आवडते ठिकाण म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. तर मध्यवर्ती ठिकाण असल्याने सैन्यांचे मध्यवर्ती तळही या ठिकाणी अस्तित्वात होते, असे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात.
PIM25B20230