पिंपळे गुरव, ता.१९ ः पर्यावरण संरक्षण आणि प्लॅस्टिक वापर कमी करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सुमारे २४ लाख रुपये खर्चून १६ प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशिन बसविल्या. मात्र, सद्यः स्थितीत त्यापैकी तब्बल १३ मशिन्स बंद पडल्या आहेत. उर्वरित निष्क्रीय अवस्थेत पडून आहेत. काही ठिकाणी तर मशीन्समध्ये कपडे, कचरा टाकण्यात आला असून धूळखात पडल्या आहेत.
महापालिकेने शहरातील गर्दीच्या विविध ठिकाणी, बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी या प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशिन्स बसविल्या होत्या. वापरलेल्या पाण्याच्या किंवा थंडपेयांच्या प्लास्टिक बाटल्या नागरिक थेट मशीनमध्ये टाकतील आणि मशिन त्या क्रश करून त्यांचे प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी उपयुक्त ठरेल. प्लॅस्टिक कचरा कमी होऊन स्वच्छतेलाही हातभार लागेल, असा त्यामागील उद्देश होता. मात्र, सुरुवातीला काही दिवस या मशीन्स कार्यरत राहिल्या आणि त्यानंतर हळूहळू निष्क्रिय झाल्या. देखभाल, तांत्रिक बिघाड आणि दुर्लक्षामुळे ही महागडी उपकरणे आज वापराविना आहेत.
तक्रारी अन् मागण्या
- स्वच्छता उपक्रम परंतु, ही मशीन्स आता अस्वच्छतेचे केंद्रे
- प्लास्टिक बाटल्या क्रश करण्याऐवजी कचरा टाकण्यासाठी वापर
- मशीनमध्ये कचरा, कपडे व धूळ मात्र देखभाल कोणी करत नाही
- करदात्यांच्या पैशांचा हा अपव्यय, तातडीने मशीन्स दुरुस्त करून कार्यान्वित कराव्यात
- या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी
मशीन्स सुरू करणे गरजेचे
प्लॅस्टिक प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. केंद्र, राज्य सरकार प्लॅस्टिक बंदीबाबत कठोर पावले उचलत आहेत. अशा वेळी शहरात आधीच बसविलेल्या प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशीन वापरात आणणे ही काळाची गरज आहे. या मशीन्स पुन्हा सुरू केल्या; तर नागरिकांची सोय होईलच. शिवाय पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल. परंतु त्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलून सातत्यपूर्ण देखभाल यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे.
दृष्टिक्षेपात आकडेवारी
- एप्रिल २०२२ मध्ये १६ मशिन्सची खरेदी
- एका मशीनची किंमत १,४९,००० रुपये
- सोळा मशिन्सवर खर्च २३, ८४,००० रुपये
- सद्यःस्थितीत तब्बल १३ मशीन बंद
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आठही प्रभागांतील देण्यात आलेल्या प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशिन्स चालू करण्याबाबत सूचना देण्यात येईल. तसेच त्याचा योग्य वापर होण्याबाबत कळविले जाईल.
- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशिन्सवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाहता या मशीनचा वापर होणे आवश्यक आहे. अन्यथा, केवळ प्रकल्प निधी खर्च करण्यासाठी राबविला की पर्यावरण संरक्षणासाठी ? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होईल. त्यामुळे प्रशासनाने सर्व मशीन चालू करून लोकांना वापराबाबत योग्य माहिती द्यावी.
- ॲड. आकाश कांबळे, नागरिक
PMG25B02866
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.