पिंपरी, ता.४ ः हजारो लोकांच्या नजरा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणच्या (म्हाडा) सोडतीकडे लागलेल्या असतात. मात्र, आवाक्याबाहेर असलेल्या किमती आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी होणारी दमछाक यामुळे लोक फिरकत नाहीत अशी स्थिती आहे. सतत सोडत काढूनही प्रतिसाद नसल्याने शहरात सहा हजारपैकी २८६४ इतक्या सदनिका दोन वर्षांपासून पडून आहेत. आता कागदपत्रांची संख्या अवघी सहा केल्यामुळे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ‘म्हाडा’ला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील पिंपरी वाघेरे, मोरवाडी, ताथवडे व मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे १२ ते २१ मजली इमारती म्हाडाने उभारल्या आहेत. यामध्ये अत्यल्प, अल्प उत्पन्न, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी ६ हजार ३४२ सदनिका आणि गाळे बांधून तयार आहेत. परवडणाऱ्या दरात सर्वसामान्य लोकांना घर मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने ‘म्हाडा’ची स्थापना करण्यात आली. मात्र, जी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत, त्याच्या किमती आवाक्याबाहेर आहेत, नागरिकांचे म्हणणे आहे.
सद्यःस्थिती
परिसर तयार विक्री न झालेले
- पिंपरी वाघेरे स्कीम एक ९३५.... ४००
- पिंपरी वाघेरे स्कीम दोन ३०८..... ३०८
- मोरवाडी म्हाडा कॉलनी ८६३..... १००
- संत तुकाराम नगर - ०७३ ... ०७३
- संत तुकाराम नगर - ०४० (गाळे)..०४०
- ताथवडे - ६८०... ६८०
- म्हाळुंगे - २,६८१... १,४८१
- तळेगाव दाभाडे - ७६२.... ०२०
पूर्वी २१ कागदपत्रे लागत होती.
आता आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र आणि स्वयं घोषणापत्र इतकीच आवश्यकता आहे.
--
‘‘वीस ते पंचवीस वर्षापूर्वी म्हाडाचे धोरण हे ‘गृहनिर्माण’चे होते. वीस टक्के रक्कम भरून ८० टक्के कर्ज १३ वर्षांचा परत फेडीचा करार केला जाई. आता खासगी विकसकाप्रमाणे निवासी गाळ्यांची किंमत ताब्यात देण्यापूर्वीच वसूल करून घेते. ३५ ते ५५ लाखांपर्यंतचे घर घ्यायचे झाले तर बँकेचा हप्ता वगैरे वजा जाता खर्च परवडणारा नाही. म्हणून ही घरे परवडणारी ठरत नाहीत.
- सरिता जाधव, संत तुकारामनगर
३५ ते ४० लाखांच्या किमती पाहिल्यानंतर स्वप्नच न पाहिलेले बरे. ‘म्हाडा’ने पूर्वीच्या चाळ पद्धतीची घरे बांधावीत. स्वच्छतागृह, स्नानगृहाच्या सोयींसह ३४० चौरस फुटांची चाळ पद्धतीतील स्वतंत्र घरे सामान्यांना परवडू शकतात. परवडतील अशी कमी क्षेत्रफळाची घरे अधिक बांधून, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कमी टक्क्यात कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- पुष्पा सेठी, मोरवाडी
आताही ३८ लाखांच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यासाठी म्हाडाने पूर्वीप्रमाणे ‘वन रूम किचन’ची काही घरे निर्माण केली पाहिजेत आणि त्यासाठीचे ‘जसे उत्पन्न तशी घरे’ असा निकष ठेवल्यास सर्वसामान्यांना घर घेणे सहज शक्य होईल.
- राजेंद्रसिंग चौहान, पिंपळे गुरव
म्हाडाच्या योजना चांगल्या आहेत. नागरिकांना पार्किंग, गार्डन, लिफ्ट अशा सुविधा दिल्या आहेत. पण काही ठिकाणी घरांच्या किमतीमुळे अल्प प्रतिसाद आहे, हे वास्तव आहे.
- अनंत खेडकर, कार्यकारी अभियंता, म्हाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.