आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता.१० ः ओबीसी, ईबीसी आणि विमुक्त, भटक्या व अर्ध-भटक्या जमाती प्रवर्गातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘पीएम यशस्वी शिष्यवृत्ती’ ही एक केंद्रीय योजना लागू केली आहे. परंतु पुरेशा माहिती आणि प्रचार- प्रसाराअभावी अनेक पात्र विद्यार्थी या योजनेबद्दल अनभिज्ञ आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी शहरातील ‘टॉप क्लास’ शाळेच्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळ अर्थात नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (एनएसपी) वर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जे सध्या इयत्ता ९ वी किंवा इयत्ता ११ वीमध्ये शिकत आहेत. या विद्यार्थ्यांनी अशा शाळेत शिक्षण घेतले पाहिजे, ज्या शाळेत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांमध्ये सातत्याने १०० टक्के निकाल लागले आहेत. या सर्व निकषांची पूर्तता करणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. गेल्या वर्षी दहावी परीक्षेचा शहरातील चक्क २१३ शाळांपैकी १३८ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. तर बारावीच्या १२५ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. मात्र, पात्र विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून अर्ज भरण्यासाठी संपर्क साधण्याची गरज आहे.
नियम, निकष अन् लाभ
- मागील वर्गातील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी निश्चित होणार
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल १२.५० लाख रुपये असावे
- मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव
- इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये
- इयत्ता ११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १,२५,००० रुपये
- संपूर्ण रकमेचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे वितरण
- विद्यार्थ्याच्या आधार कार्डाशी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार
- वसतीगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश यांचा समावेश
विद्यार्थी अनभिज्ञ का ?
माहितीचा अभाव : अनेक विद्यार्थ्यांना योजनेची माहिती नाही; त्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत
गुंतागुंतीची प्रक्रिया : शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया काहीवेळा गुंतागुंतीची वाटू शकते, त्याने विद्यार्थी गोंधळतात
जागृतीचा अभाव : समाजमाध्यमे आणि शासकीय संकेतस्थळांवरील माहिती असूनही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी जागरूकता
अर्ज कसा करावा ?
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) : पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे सुचविण्यात आले आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन योजनेची माहिती घेता येईल.
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातीत. अनेक विद्यार्थ्यांना कसा लाभ मिळविता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील.’’
- डॉ. गणपत मोरे, शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग
‘एक पेड माँ के नाम’, ‘मेरी मिट्टी मेरा देश’, ‘हरित स्वच्छ भारत’.. अशा उपक्रमांची माहिती शासनाकडून वेळोवेळी पाठविण्यात येते. त्याची छायाचित्रे, लिंक अपलोड केली जातात. पण, विद्यार्थ्यांच्या हिताची योजना विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.