पिंपरी, ता. ११ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते दापोडीदरम्यान समतल विलगकामधील (ग्रेड सेपरेटर) रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच सेवा रस्त्यांची दुरवस्था, अर्बन स्ट्रीटची अर्धवट कामे आणि जलवाहिनीसाठी बीआरटी मार्गाचे खोदकाम यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. नागरिकांना याचा त्रास होत असताना सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महामार्गाने विनाअडथळा जाता यावे, या उद्देशाने दापोडी ते निगडीदरम्यान १२.५० किलोमीटरचे तीन समतल विलगक, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. यामुळे विनाअडथळा प्रवास करत अगदी कमी वेळात दापोडीपर्यंत जाता येते. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालक हा रस्ता वापरतात. पण, सध्या ग्रेड सेपरेटरमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे या रस्त्यावर भेगा पडल्या होत्या. महामेट्रो प्रशासनाने काही ठिकाणी मलमपट्टी केली. पण, अजूनही बऱ्याच ठिकाणी रस्ता भेगाळलेलाच आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. तेथे अपघाताचा धोका आहे.
डांबर-मुरूम गेले वाहून
पिंपरी ते दापोडी सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. इम्पायर इस्टेट ते चिंचवड स्टेशन सिग्नलपर्यंत डांबरीकरण केले होते. पालिका प्रशासनाने काही ठिकाणी खड्डे बुजविले. त्यानंतर एकाच पावसात डांबर, मुरुम वाहून गेला असून पुन्हा खड्डे पडले आहेत. यावरुन पालिकेच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
‘अर्बन स्ट्रीट’ची कामे अर्धवट
शहरात शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) पालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाकडून जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पादचारी मार्ग, सायकल मार्ग, बीआरटी मार्गिकेलगत पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, पिंपरी, इम्पायर इस्टेट, चिंचवडसह अनेक ठिकाणची कामे कंत्राटदाराने अर्धवट सोडली आहेत. कुठे ब्लॉक टाकले नाहीत, तर कुठे दोन्ही बाजूला पदपथाचे काम करुन मधला टप्पा सोडून दिला आहे. कुठे बीआरटी मार्गिकेलगत पथदिवे बसविण्याचे काम अर्धवट केले आहे. या कंत्राटदारावर महापालिका काहीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.
बीआरटी मार्गही बंद
दापोडी, फुगेवाडी सांगवीसह जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूंच्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बीआरटी मार्गातून नव्याने स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बीआरटी मार्ग बंद केला आहे. निगडी ते मोरवाडीदरम्यान महामेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारा बीआरटी मार्ग बंद आहे. परिणामी, पीएमपी बस सेवा रस्त्यांवरून धावत आहेत. त्यामुळे तेथेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
अंतर्गत रस्त्यांची चाळण
शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी अपघातही होत आहेत. पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तात्पुरती मलमपट्टी केली होती. पण, त्यानंतर झालेल्या पावसात पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. पालिका प्रशासन रस्त्यावरील खड्डे कधी बुजविणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आणि नाशिक फाटा ते आकुर्डी रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- अनिकेत राठी, नागरिक
ग्रेड सेपरेटरमध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथ होऊन अपघात होत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेला कधी जाग येणार?
- महेश देऊपूरकर, नागरिक
ग्रेड सेपरेटरमधील खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सेवा रस्ता खराब आहे, तेथे डांबरीकरण करणार आहोत. पण, त्यासाठी पाऊस पूर्णपणे थांबणे आवश्यक आहे. त्यानंतर कामे सुरू करू.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
ग्रेड सेपरेटरबद्दल थोडक्यात
- उद्देश : विनाअडथळा प्रवास
- दापोडी ते निगडी (१२.५ किलोमीटर)
- मूळ बांधकाम : ३ ग्रेड सेपरेटर, ८ भुयारी मार्ग, २ उड्डाणपूल
- सध्याची अवस्था : जागोजागी खड्डे, भेगाळलेले रस्ते, सेवा रस्त्यांची चाळण, अर्बन स्ट्रीटची कामे अर्धवट
- बीआरटी मार्गातील खोदकामामुळे अडथळ्यांत वाढ
- प्रवाशांना होणारा त्रास : वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, वाढलेला प्रवासाचा वेळ, इंधनाची नासाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.